लसीकरणाचा सावळा गोंधळ, मुंबई, कोल्हापूरचे लोक कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:31 AM2021-05-09T04:31:52+5:302021-05-09T04:31:52+5:30

रत्नागिरी : राज्यात सर्वच भागात मागणी इतकी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ उडाला आहे. जिथे लस ...

The shadow of vaccination confusion, people of Mumbai, Kolhapur in Konkan | लसीकरणाचा सावळा गोंधळ, मुंबई, कोल्हापूरचे लोक कोकणात

लसीकरणाचा सावळा गोंधळ, मुंबई, कोल्हापूरचे लोक कोकणात

Next

रत्नागिरी : राज्यात सर्वच भागात मागणी इतकी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ उडाला आहे. जिथे लस उपलब्ध होत आहे, अशाठिकाणी लोक धाव घेत असून, मुंबई, कोल्हापूरचे लोक रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लस घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरुन आलेल्या लोकांचा रांगा लसीकरण केंद्रावर लागत आहेत.

तरुणांना लस देण्याची मोहीम सुरू करताना लसीच्या पुरवठ्याचा विचार करण्यात आला की नाही, हाच प्रश्न आता लोकांच्या मनात येत आहे. लसीची उपलब्धता होत नसल्याने आणि नोंदणी पाच मिनिटात फुल्ल होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातून लसीकरण केंद्रांवर बाचाबाचीचे प्रकार वाढू लागले आहेत.

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील लोकांना प्राधान्याने लस देण्यात आली. कोरोना योद्धा म्हणून पहिल्या फळीत काम करत असल्याने त्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर पोलीस यंत्रणेतील लोकांना लस देण्यात आली. नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या सगळ्या टप्प्यांमध्ये पहिल्यापासूनच गती मंदावलेली होती. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात भीती होती. पण ज्यावेळी मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तेव्हापासून लसीकरणाला प्रतिसाद वाढू लागला. हा प्रतिसाद वाढत असतानाच लसीचा पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून सतत या मोहिमेत खंड पडतच आहे.

आता या मोहिमेला १८ ते ४४ वयोगटाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे लसीची मागणी अधिकच वाढली आहे. आता त्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाला सुसुत्रता येईल, असे अपेक्षित असताना उलट गोंधळ वाढला आहे. ज्यांची नोंदणी होत आहे, त्यांनाही लस मिळत नसल्याची ओरड होत आहे.

................................

ऑनलाईन नोंदणीचा गोंधळ

नावाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी वेबसाईट देण्यात आली आहे, त्यावर लस घेणाऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. त्या मोबाईलवर ओटीपी (वन टाईम पीन) क्रमांक पाठवला जातो. हा ओटीपी वेबसाईटवर नोंदवावा लागतो. मात्र, ओटीपी येईपर्यंत वेबसाईटवर त्या दिवसाचे रजिस्ट्रेशन फुल्ल झालेले असते. गणपतीच्या दिवसात कोकणात येणाऱ्या रेल्वेच्या किंवा बसेसच्या तिकिटांचे बुकिंग जितक्या वेळात संपते, तितक्या वेळात लसीकरणाची नोंदणीही संपत आहे.

.................

मुंबई, कोल्हापूरचे लोक

महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला कोठेही जाऊन लस घेता येण्याची सुविधा नोंदणीमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी, शनिवारी मुंबई, कोल्हापूरचे लोक रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यामुळे केंद्रांवरील रांगा वाढल्या आणि स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहिले.

...............

दुसऱ्या लसीचा घोळ

पहिला डोस घेऊन ४०/५० दिवस झाले तरी दुसरा डोस उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. त्यातही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बराच काळ उपलब्ध झालेला नाही. त्यामुळेही ओरड वाढली आहे. राज्य सरकारने आता १८ ते ४४ या वयोगटाला प्राधान्य दिले असून, ४५ वर्षांवरील लोकांची मोठी अडचण होत आहे. राजापुरात तर रोज रांग लावूनही लस न मिळालेल्या संतप्त लोकांनी लसीकरण केंद्रासमोरच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: The shadow of vaccination confusion, people of Mumbai, Kolhapur in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.