शाहू महाराजांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शनीय : अन्वर मोडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:22 AM2021-06-28T04:22:09+5:302021-06-28T04:22:09+5:30
सावर्डे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा वारसा समर्थपणे पुढे सुरू ठेवण्याचे अतुलनीय काम करणारा एक मानवतावादी आदर्श ...
सावर्डे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा वारसा समर्थपणे पुढे सुरू ठेवण्याचे अतुलनीय काम करणारा एक मानवतावादी आदर्श राजा म्हणून शाहू महाराजांची इतिहासात नोंद आहे. त्यांनी सर्वसामान्यांच्या उद्धाराचे काम केले. त्यांचा दृष्टिकोन व सर्वसामान्यांविषयी असणारा आदरभाव आजच्या व येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शनीय आहे, असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक यांनी व्यक्त केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक व पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी शाहू महाराजांच्या कार्याची सचित्र ओळख करून देणारे भित्तीपत्रक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिलीप डंबे व सुधीर कदम यांनी तयार केले होते. त्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका मुग्धा पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक अन्वर मोडक म्हणाले की, बहुजन समाजाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढून तत्कालीन रूढी, प्रथा, परंपरा नाकारून बहुजनांच्या जीवनाला एक नवी दिशा देण्याचे काम शाहू महाराजांनी केले आहे. समानतेचा अंगीकार करावा, हे तत्व त्यांनी अवलंबले होते. त्यांच्या या कामात त्यांना प्रखर विरोध होत असतानाही त्याचा विचार न करता त्यांनी या सर्व तत्त्वांची अमलबजावणी केली होती. शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या आदर्श राजाचे गुण आपण सर्वांनी अंगिकारावेत, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर कदम यांनी केले तर दिलीप डंबे यांनी आभार मानले.
--------------------
शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक यांच्या हस्ते करण्यात आले.