महाळुंगेवासीयांनी राखली मुख्यमंत्र्यांच्या सभेची लाज

By admin | Published: January 20, 2016 11:55 PM2016-01-20T23:55:45+5:302016-01-21T00:27:38+5:30

खेड तालुका : जलोपासना कार्यक्रमाला मोठी गर्दी

The shame of the Chief Minister's meeting maintained by the people of Mahulungasan | महाळुंगेवासीयांनी राखली मुख्यमंत्र्यांच्या सभेची लाज

महाळुंगेवासीयांनी राखली मुख्यमंत्र्यांच्या सभेची लाज

Next

खेड : तालुक्यातील महाळुंगे गावातील जलोपासना कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला चांगली गर्दी झाली होती. मात्र, ही गर्दी बाहेरच्यांनी नाही तर महाळुंगे गावासह अठरा गाव धवडे बांदरी विभागातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे झाली होती. अन्यथा या कार्यक्रमाचाच विचका झाला असता, असे म्हटले जात होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला दोन दिवस उलटून गेले तरीही अद्याप या दौऱ्याची चर्चा खेड तालुक्यात सुरु आहे.
जगबुडी नदीतील पाण्यावर जलोपासना अभियान राबविण्याच्या कार्याला रविवारी प्रारंभ करण्यात आला. डॉ़ राजेंद्रसिंह हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाळुंगे गावासह अठरा गाव धवडे बांदरी विभागातील शेतकरी आणि ग्रामस्थ येथे प्रत्यक्ष काम करणार आहेत. पैसा सरकार देणार असले तरीही येथील गोरगरीबांचे प्रत्यक्ष हात याठिकाणी राबणार आहेत. या कामासाठी निधी देणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्यांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
रविवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेला शेतकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीने जिंकून घेतले होते. या सभेला आयोजकांनी पाच हजार खुर्च्यांची व्यवस्था केली होती. या खुर्च्या महाळुंगे गावातील ग्रामस्थ तसेच अठरा गाव धवडे बांदरी विभागातील सह््याद्रीच्या खोऱ्यातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीने ही हाउसफुल्ल झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे संयोजक संजय यादवराव आणि येथील प्रथितयश शेतकरी सतीश कदम यांनी कार्यक्रमाबाबत परिसरातील सर्व गावांमधून जनजागृती केली होती. जगबुडी नदीच्या पाण्याचा जास्त वापर आपल्याला करावयाचा आहे, नदीतील पाण्याचा वापर आणि उपयोग याबाबत त्यांनी ग्रामस्थांमध्ये जागृती केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेला खेड शहरातील काही मान्यवर वगळता या कार्यक्रमाकडे कोणीही फिरकले नसल्याचे पहावयास मिळाले.
विशेष म्हणजे, भाजपचे खेड तालुक्यात फार मोठे प्राबल्य नाही. त्यामुळे या सभेला कितपत गर्दी होईल, हे प्रश्नचिन्हच होते. तरीही मुख्यमंत्री येणार म्हणून गर्दी जमली. त्यातही महाळुंगे आणि अठरा गाव धवडे बांदरी विभागातील ग्रामस्थांची संख्या मोठी होती.
केवळ कोकणापुरते हे अभियान मर्यादीत नसून, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी असल्याने आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबविण्यात येत असल्याने या सभेला मोठा प्रतिसाद मिळणे आवश्यक होते. मात्र, तो न मिळाल्याने या कार्यक्रमाची खरी लाज ही महाळुंगे आणि अठरा गाव धवडे बांदरी विभागातील तमाम ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनीच राखली. (प्रतिनिधी)

गैरहजेरी : वर्चस्व राखण्याचा भाजपचा प्रयत्न
भाजप शिवसेनेच्या गैरहजेरीत अशा कार्यक्रमामधून आपलाच वरचष्मा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. रामदास कदम आमदार असले तरी ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते शिवसेनेचे नेते असले तरीही त्यांचा खेडसह जिल्हाभरात पूर्वीसारखा वचक राहिलेला नाही तर पालकमंत्री रवींद्र वायकर हे जिल्ह््यात नवीन आहेत. याच संधीचा फायदा भाजप घेताना दिसत आहे.


सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची पाठ
खेड, दापोली व मंडणगडचे आमदार संजय कदम हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांच्यासमवेत असलेले दोनचार कार्यकर्ते वगळता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा एकही नेता या कार्यक्रमामध्ये फिरकला नाही, हे विशेष. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने कार्यक्रमाची सारी सूत्रे भाजपच्याच हाती होती.

Web Title: The shame of the Chief Minister's meeting maintained by the people of Mahulungasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.