आशा स्वयंसेविकांना शिमग्याचे पोस्त
By Admin | Published: March 14, 2017 06:10 PM2017-03-14T18:10:07+5:302017-03-14T18:10:07+5:30
रखडलेले मानधन पंचायत समितीकडे जमा
आशा स्वयंसेविकांचे रखडलेले मानधन पंचायत समितीकडे जमा
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आशा स्वयंसेविकांचे रखडलेले मानधन पंचायत समिती आरोग्य विभागाकडे जमा झाले आहे. येत्या चार दिवसांत हे मानधन आशा स्वयंसेविकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या माध्यमातून आशा स्वयंसेविकांना शिमग्याचे पोस्त दिले जाणार आहे.
संगमेश्वर तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये बुरंबी, देवळे, धामापुर, क डवई, माखजन, कोंड उमरे, निवे खुर्द,फुणगुस, साखरपा, सायले, वांद्री यांचा समावेश आहे.या अंतर्गत तालुक्यात १४३ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या सेविका मानधन तत्त्वावर प्रामाणिकपणे सेवा वाहत असतात. केलेल्या कामानुसार त्यांना मानधन अदा केले जाते.
गरोदर माता, क्षयरोग, कुष्ठरोग आदी आजारांच्या रूग्णांची काळजी घेणे, पल्स पोलिओ मोहिमेत सहभाग आदी ग्रामपातळीवर विविध कामांचा निपटारा आशा स्वयंसेविका करतात. संगमेश्वर तालुक्यातील आशा स्वयंसेविका प्रामाणिकपणे, स्वत:ला झोकून देत सामाजिक बांधिलकीने काम करत असल्याचे चित्र आहे.
आशा स्वयंसेविकांचे रखडलेले मानधन सुमारे १ लाख ३० हजार रूपये इतकी रक्कम पंचायत समिती आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली आहे. ही रक्कम प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राक डे वर्ग करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्र्रामार्फत आशा स्वयंसेविकांच्या कामाचे मुल्यांकन करून रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे सेविकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. मानधन अदा करून शासनाने सेविकांना शिमग्याची भेट दिली आहे. (प्रतिनिधी)