शांता नारकर यांचे हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:23+5:302021-04-18T04:31:23+5:30
देवरुख : सामाजिक बांधिलकी आणि संवेदना ठेऊन मोलाचे कार्य करणाऱ्या मागच्या पिढीतील महान धुरीणी देवरुख मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा ...
देवरुख : सामाजिक बांधिलकी आणि संवेदना ठेऊन मोलाचे कार्य करणाऱ्या मागच्या पिढीतील महान धुरीणी देवरुख मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा शांता विजय नारकर यांचे शुक्रवारी सायंकाळी ७.३९ वाजता हृदयविकाराने निधन झाले. पती विजयभाऊंच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत, त्यांनी मातृमंदिर संस्थेत मोठे योगदान दिले आहे.
न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोकणच्या मदर तेरेसा मावशीबाई हळबे यांच्या सान्निध्यात त्यांनी खूप वर्षे काम केले. त्यांना कै.रामविलास लाहोटी स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार, गुरुवर्य अ.आ. देसाई ट्रस्टचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचा राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी गाैरविण्यात आले आहे. अनेक संस्थावर पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आयुष्य वेचले. विशेषतः दहावी नापास मुलींसाठी चांगले कार्य करून मनाली हा प्रकल्प सुरू केला होता. शांताबाई म्हणून त्या विशेष लोकप्रिय होत्या. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, संपादित केली. ‘क्षण कसोटीचे’ हे त्यांचे पुस्तक गाजले. पती विजय नारकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी भाऊंच्या जीवनावरील कातळावरचा ‘तपस्वी’ हे पुस्तक संपादित केले. त्यांच्या जाण्याने मातृमंदिर जणू पोरकेच झाले आहे.