गुहागरच्या खातू मसाल्याची शरद पवारांनाही भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:17+5:302021-08-01T04:29:17+5:30
गुहागर : सातासमुद्रापार पोहोचलेल्या गुहागर तालुक्यातील खातू मसालेने आता शरद पवार यांच्या कुटुंबीयांनाही भुरळ घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ...
गुहागर : सातासमुद्रापार पोहोचलेल्या गुहागर तालुक्यातील खातू मसालेने आता शरद पवार यांच्या कुटुंबीयांनाही भुरळ घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांनी खास पत्र देऊन खातू मसाले कोकणी खाद्यपदार्थांच्या चवीत अधिक भर टाकतील, अशा शब्दात स्तुती केली आहे.
चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि शरद पवार कुटुंबीयांचे घरोब्याचे संबंध आहेत. शेखर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम यांनी शरद पवार यांच्या भेटीदरम्यान पवार कुटुंबीयांना खातू मसाले भेट म्हणून दिले होते. ही भेट पवार कुटुंबीयांना इतकी आवडली की, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत आपल्या सहीचे खातू मसाले उद्योगाला एक स्वतंत्र पत्र दिले. या पत्रात शरद पवार म्हणतात की, कोकणी खाद्यपदार्थ चवीकरता जगभरात प्रसिद्ध आहेत. खातू मसाले उद्योगातील विविध प्रकारचे मसाले कोकणी खाद्यपदार्थाच्या स्वादात अधिक भर टाकतील, असे लिहून व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. हे पत्र मुंबईतील कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहे.
याबाबत खातू मसालेचे शाळीग्राम खातू यांनी सांगितले की, आमदार निकम यांच्यामुळे पवार कुटुंबीयांच्या घरी गेली अनेक वर्षे खातू मसाले जात आहेत. खासदार सुप्रिया सुळे या आवर्जून खातू मसाले वापरतात. शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याने पत्र पाठवून आमच्या उत्पादनांचे कौतुक केले. गेली अनेक वर्षे बाजारपेठेत खातू मसाले विशेष गुणवत्तेमुळे अग्रेसर आहेत याची पोचपावतीच या पत्रातून आम्हाला मिळाली असून ती आमच्यासाठी लाख मोलाची आहे, असे शाळीग्राम खातू यांनी सांगितले.