Raj Thackeray : "छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत आणि मला हे....", राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 08:52 PM2023-05-06T20:52:52+5:302023-05-06T20:52:52+5:30
या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला.
रत्नागिरीः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला. "२०१४ च्या आधी तेव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार अशी घोषणा केली. मी त्यावर काय बोललो, हे लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा ह्या पुतळ्याला विरोध आहे. मी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं वाटतं तुम्हाला? बरं हे बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार हे महाराजांचे नाव घेत नाहीत आणि हे मला बदनाम करणार", असे राज ठाकरे म्हणाले.
"माझा मुद्दा इतकाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर १०,००० कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचे खरे स्मारक आहे, त्यांचे आधी संवर्धन करा, हे माझे म्हणणे होते. पण माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला. कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, इतकं वैविध्य असलेलं कोकण. इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काहीच घेणं देणं नाही", असे राज ठाकरे यांनी सांगितलं
याचबरोबर,"इथल्या लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं. २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. १९९२ च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलंय आपण", असेही राज ठाकरेंनी म्हटलं
बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध
रत्नागिरीच्या सभेतून राज ठाकरेंनी बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. अशा प्रकल्पांना जमिनी देणाऱ्यांवरही राज ठाकरेंनी टीका केली आहे. "तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व काय? कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे काय आहात? या जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर आहे, त्यावर तुम्ही उभ्या आहेत. जमीन म्हणजे काय? भुगोल. मोगलांचं राज्य आलं, ब्रिटिशांचं राज्य आलं, युद्ध झाले. यांनी तिथे आक्रमण केलं, या सगळ्यांचा इतिहास म्हणून पाहिला तर तो इतिहास भुगोलाशिवाय नाही. प्रत्येकाने जमीन पादक्रांत केली, जमीन ताब्यत घेतली. या देशाची, प्रदेशाची जमीन ताब्यात घेतोय. हे जमीन ताब्यात घेतो ना त्याला इतिहास म्हणतात", असं राज ठाकरे म्हणाले.