महाविकास आघाडीची ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबरला जागा वाटपासाठी बैठक, शरद पवार यांनी दिली माहिती

By संदीप बांद्रे | Published: September 23, 2024 04:44 PM2024-09-23T16:44:40+5:302024-09-23T16:45:19+5:30

जर का कोणी उमेदवारीचा आताच दावा करत असेल, तर..

Sharad Pawar informed when the meeting regarding seat allocation of Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीची ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबरला जागा वाटपासाठी बैठक, शरद पवार यांनी दिली माहिती

महाविकास आघाडीची ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबरला जागा वाटपासाठी बैठक, शरद पवार यांनी दिली माहिती

चिपळूण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तेव्हा घटक पक्षातील कोणी विधानसभेच्या कुठल्याही जागेवर दावा केला, तरी याचा अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांच्या एकत्रित होणाऱ्या बैठकीनंतरच जाहीर केला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वा. सावरकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेआधी पवार यांनी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले,  उमेदवारीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. परंतु हा निर्णय एका पक्षाचा राहिलेला नाही. तो महाविकास आघाडीचा निर्णय असून तो एकत्रित घेतला जाणार आहे. त्यामुळे यासंदर्भातील आता होणारे दावे निरर्थक आहेत. जर का कोणी उमेदवारीचा आताच दावा करत असेल, तर त्यांच्या बाबतीत 'बाजार तुरी आणि कोण कोणाला मारी', असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल, असे स्पष्ट केले. 

मुंबई-गोवा महामार्गाबाबत नाराजी, सत्ता आल्यास भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढू

कोकणातील प्रमुख मार्ग असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत खासदार पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. १४ वर्षे होऊनही हा प्रकल्प पूर्ण होत नसेल, तर ते सरकारचे मोठे अपयश आहे. यामध्ये निश्चित भ्रष्टाचार झालेला आहे. या कामाविषयी जेवढ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत, तेच या कामाच्या निकृष्ट दर्जाचा दाखला आहे. तेव्हा या रस्त्याच्या कामाबद्दल लोकं जर तक्रारी करत असतील, तर ते अजिबात चुकीचे नाही. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास या कामातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढू, असा इशाराच खासदार पवार यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा 

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. जरांगे यांची मागणी योग्य असल्याने आरक्षणाला पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर छोट्या छोट्या समाजाचाही विचार व्हावा व त्यांना आरक्षणा मध्ये सामावून घेण्यात यावे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

उभ्या आयुष्यात असा रस्ता पाहिला नाही!

चिपळुणातील जाहीर सभेसाठी खासदार शरद पवार हे कराड मार्गे कुंभार्ली घाटाने आले. या रस्त्यावर पाठण, हेळवाक दरम्यान पडलेल्या खड्ड्यांविषयी बोलताना खासदार पवार यांनी उभ्या आयुष्यात असा रस्ता मी पाहिला नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. एका वर्षात तीन वेळा या रस्त्याची दुरुस्ती केली म्हणे, राज्यात महायुतीचा हा असाच कारभार सुरू राहिला, तर एक दिवस देश खातील, अशीही खंत व्यक्त केली.

Web Title: Sharad Pawar informed when the meeting regarding seat allocation of Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.