शतकोटींचे अंदाजपत्रक

By admin | Published: February 24, 2015 10:08 PM2015-02-24T22:08:46+5:302015-02-25T00:13:53+5:30

रत्नागिरी नगर परिषद : शुक्रवारी सभा; रस्ते, पाणी वितरण व्यवस्थेवर भर

Shatakoti budget | शतकोटींचे अंदाजपत्रक

शतकोटींचे अंदाजपत्रक

Next

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०१५ - १६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात कोटींचे शतक झाल्याचा विक्रम पाहावयास मिळणार आहे. २७ फेबु्रवारी रोजी मांडले जाणारे हे अंदाजपत्रक तब्बल ११८ कोटी २७ लाख ४१ हजार ८०३ रुपये शिलकीसह जमेचे असून, १०९ कोटी ५२ हजार अंदाजित खर्च दाखवण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात ९९ कोटी रूपयांहून अधिक रक्कम पालिकेच्या खात्यात जमा, तर एकूण खर्च ६७ कोटी रूपये इतका अपेक्षित आहे. सभागृहात विकासविषयक विविध विषयांवर चर्चा होऊन हे अंदाजपत्रक मांडले जाणार आहे. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या कारकिर्दीतील पालिकेचे हे पहिलेच अंदाजपत्रक आहे. विशेष म्हणजे यंदाचे हे अंदाजपत्रक जम्बो असेल. रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच एवढे मोठे अंदाजपत्रक सादर होणार आहे. शासनाच्या विविध योजनांतून मिळणाऱ्या निधीचा लाभ घेत शहराचा भक्कम विकास करण्यासाठीच एवढ्या मोठ्या रकमेचे अंदाजपत्रक पालिकेच्या इतिहासात येत्या सभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकात नेमक्या कोणत्या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे, याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अंदाजपत्रकातील २० टक्के रक्कम ही पालिकेच्या उत्पन्नातून जमा होणार आहे. केंद्र व राज्याच्या विविध योजनांमधून प्रत्येकी ४० टक्के निधी जमा होणार आहे. राज्याच्या सुजल निर्मल योजनेतून पाण्याशी संबंधित योजनांना निधी मिळणार आहे. तसेच नगरोत्थान योजनेतून रस्ते व अन्य विकासकामांना निधी प्राप्त होणार आहे.
शासनाकडून मिळणाऱ्या निधीतूनच शहरातील गटारे, रस्ते, पाणी या समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद होणार असल्याचा अंदाज पालिका वर्तुळातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

पाणी वितरण व्यवस्था
शहरवासीयांची गेल्या १० वर्षांपासूनची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अंदाजपत्रकात भरघोस तरतूद होण्याची शक्यता आहे. शहरातील नळयोजनेद्वारे पाणी वितरीत करणाऱ्या संपूर्ण जलवाहिनीचे जाळे कालबाह्य झाले आहे. त्यामुळे हे संपूर्ण जलवाहिनीचे जाळे बदलले जाणार आहे. सध्या मुख्य जलवाहिनीवरून थेट नळ जोडण्या देण्यात आल्याने नागरिकांना अनेक भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. तसेच शीळ धरणावरील जलवाहिनी जागोजागी फुटत असल्यानेही धरणात पाणी असूनही पाणीपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यासाठी शीळ धरणावरून साळवी स्टॉपकडे येणारी जलवाहिनी बदलली जाणार आहे.


तारांगण, डांबरीकरण, पर्यटन
अंदाजपत्रकात ज्या विकासकामांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे, त्यामध्ये तारांगण उभारणे, रस्त्यांचे डांबरीकरण, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण, पर्यटन विकासासाठी सुविधा निर्माण करणे, पर्यटनस्थळे म्हणून विकसित होणाऱ्या भागांचे सुशोभिकरण करणे, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प शहरात उभारणे, दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाला चालना देणे-तेथे प्रकल्प उभारणे. अपार्टमेंटमधील कंपोस्ट खत मशिन्स प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, शहराच्या स्वच्छतेवर भर देणे या कामांचा समावेश आहे.

Web Title: Shatakoti budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.