सागरी किनारी सुरक्षेचा विचार घेऊन निघाली ‘शीड नौका परिक्रमा’; उद्या रत्नागिरीतील मांडवी येथे येणार
By मनोज मुळ्ये | Published: December 29, 2023 06:37 PM2023-12-29T18:37:33+5:302023-12-29T18:37:45+5:30
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरी किनारी सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोहोचवण्यासाठी सागरी सीमा मंचने सागरी शीड नौका परिक्रमा आयोजित ...
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरी किनारी सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोहोचवण्यासाठी सागरी सीमा मंचने सागरी शीड नौका परिक्रमा आयोजित केली आहे. शिडाच्या नौकेने मुंबई ते विजयदुर्ग हा सागरी प्रवास होणार असून, ही नौका परिक्रमा शनिवारी (३० डिसेंबर) सायंकाळी ४ वाजता रत्नागिरीतील मांडवी येथे येणार आहे.
या परिक्रमेमध्ये ३० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. परिक्रमेदरम्यान चार ठिकाणी सागरी सुरक्षा व सागरी पर्यावरणाचे जागरण केले जाणार आहे. सागरी सीमा मंच व शिवशंभू विचार मंच या दोन संस्थांद्वारे शिडाच्या नौकेने ‘गेट वे ऑफ इंडिया’ ते विजयदुर्ग अशी परिक्रमा करण्यात येणार आहे. या परिक्रमेसाठी भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, सीमा शुल्क, सागरी पोलिस, मत्स्य विभाग यांचे सहकार्य मिळाले आहे. कुलाबा, मच्छीमारनगर येथे सागरी परिक्रमेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे आणि शिवशंभू विचारमंचचे प्रांत संयोजक अभय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
विजयदुर्गात १ राेजी समाराेप
सागरी परिक्रमेदरम्यान खांदेरी किल्ला, कुलाबा किल्ला, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, रत्नदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम, किल्लापूजन, किल्लादर्शन करण्यात येणार आहे. अलिबाग, बुरोंडी (ता. दापोली), रत्नागिरी या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. १ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता सागरी परिक्रमेचा समारोप विजयदुर्ग येथे होणार आहे. यावेळी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आणि सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक ऋषीकेश रवाळे उपस्थित राहणार आहेत.
सागरी सीमांच्या सुरक्षांचे महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी किनारपट्टीवरील रहिवाशांना सोबत घेऊन आरमार उभे केले. त्यातून सरखेल कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, हिरोजी यांच्यासारखे लढवय्ये घडले. आजही सागरी सीमांच्या सुरक्षेचे महत्त्व तितकेच आहे. परिक्रमेदरम्यान सागरी सुरक्षा आणि प्लास्टिक प्रदूषण राेखण्याबाबत जागृती केली जात आहे. - केतन अंभिरे, प्रांत संयोजक, सागरी सीमा मंच