‘रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स’ला शिखर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:36 AM2021-08-24T04:36:03+5:302021-08-24T04:36:03+5:30
रत्नागिरी : साहसी क्रीडाक्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या येथील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेच्या २५ वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीची दखल घेत ...
रत्नागिरी : साहसी क्रीडाक्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या येथील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेच्या २५ वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीची दखल घेत शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र वणजू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील व्यंकटेश डायनिंगच्या सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेवेळी वणजू यांच्यासह गाैतम बाष्टे, किशोर सावंत, गणेश चाैघुले, नेत्रा राजेशिर्के, जितेंद्र शिंदे, सुनील डोंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांची राष्ट्रप्रेरक आदर्श विचारसरणी आणि त्यांच्यासारख्या जगन्मान्य राष्ट्रभक्ताच्या हिमालयीन स्मारकाच्या स्मृती कायम जपण्याकरिता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई यांनी गेल्या वर्षांपासून गिर्यारोहकांच्या उदंड साहसाला स्वा. सावरकरांच्या नावाने गौरवांकित करण्याकरिता शिखर सावरकर साहस पुरस्कार सुरू केला आहे. २३ ऑगस्ट २०१५ या दिवशी हिमाचल प्रदेशातील बातल परिसरात एक अनामिक शिखर सर केल्यानंतर, त्या निमित्ताने गतवर्षापासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने शिखर सावरकर जीवनगौरव, शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था आणि शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक असे तीन पुरस्कार सुरू केले आहेत. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था म्हणून रत्नागिरीच्या रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पद्मश्री सोनम वांग्याल यांना जीवनगौरव पुरस्कार तर शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक पुरस्कारासाठी सुशांत अणवेकर या नवोदित आणि उच्चप्रशिक्षित
गिर्यारोहकाची निवड झाली आहे. या पुरस्कारांची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी केली.
कोविड परिस्थितीनुसार पुरस्कारप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली गिर्यारोहण संस्था आहे. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक प्रदीप केळकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखालील रत्नदुर्गचे कार्य सुरू आहे. गिर्यारोहण तसेच निसर्ग भटकंतीदरम्यान झालेल्या अपघातादरम्यान अपघातग्रस्तांचा शोध आणि बचाव, गुहा संशोधन, हिमालयीन भ्रमंती, दुर्गसंवर्धन, निसर्गसंवर्धन यांबरोबरच रत्नदुर्गचे अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे कोकणात दरवर्षी येणाऱ्या भीषण पावसाळी पूरपरिस्थितीत जीवाची बाजी लावून महिला, बालके, वृद्धांच्या जीवन सुरक्षेला प्राधान्य देऊन, लोकांच्या उदध्वस्त संसारांनाही हातभार लावण्याचे कार्य रत्नदुर्गने केले आहे. गेल्या २५ वर्षातील गिर्यारोहणाबरोबबच या संस्थेचे सेवाभावी कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
यापूर्वी या संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी चिपळूण आणि रत्नागिरी येथील भीषण पूरपरिस्थितीत रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या बचाव कार्याची दखलही या पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे.
रत्नदुर्गसारख्या संस्थेची उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था म्हणून शिखर सावरकर पुरस्काराकरिता निवड झाल्याने गिर्यारोहण वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे. या पुरस्कारात संस्थेचे सदस्य, हितचिंतक तसेच समस्त रत्नागिरीकरांचे योगदान असल्याची प्रतिक्रिया यावेळी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र वणजू यांनी व्यक्त केली.