Shimegotsav: रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाचा आजपासून रंगणार शिमगोत्सव
By अरुण आडिवरेकर | Published: March 6, 2023 04:46 PM2023-03-06T16:46:51+5:302023-03-06T16:48:11+5:30
Shimegotsav 2023: बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीबुवाच्या शिमगोत्सवाला, आज (६ मार्च) प्रारंभ होत आहे. श्रीदेव भैरीबुवाचा शिमगोत्सव सोमवार, दि. ६ मार्च ते रविवार दि. ११ मार्चपर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
- अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीबुवाच्या शिमगोत्सवाला, आज (६ मार्च) प्रारंभ होत आहे. श्रीदेव भैरीबुवाचा शिमगोत्सव सोमवार, दि. ६ मार्च ते रविवार दि. ११ मार्चपर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
सोमवारी रात्री १० वाजता सहाणेवरून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव, ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीत झाडगाव सहाणेवरून महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात जाणार आहेत. मध्यरात्री १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेव जोगेश्वरी भेटीसाठी, ग्रामप्रदक्षिणा, जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदिराबाहेर पडेल. खालची आळी, कै. बाळोबा सावंत यांच्या आगारातून महालक्ष्मी शेतातून ही पालखी मध्यरात्रीनंतर १:३० वाजेपर्यंत श्री देवी जोगेश्वरी मंदिरात जाईल.
मंगळवार, दि. ७ मार्च रोजी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे तीन वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगाव सहाणेवरून झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदर रोडमार्गे पहाटे पाच वाजता मांडवी भडंग नाका येथे जाईल. तेथून पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपे वठार मागील समुद्रमार्गाने जाऊन पुढे शेट्ये यांच्या घराजवळ रस्त्यावर येऊन खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी १० वाजता येईल. तेथून तेलीआळी भागातून, रामनाका, राममंदिर येथे सकाळी ११:३० वाजता येईल. तेथून पुढे राधाकृष्ण नाका, गोखले नाका, येथे दुपारी १२ वाजता गाडीतळावरून शेरेनाक्यावरून शिवाजी हायस्कूलशेजारी नरेंद्र सावंत यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी जाईल. तेथून होळीचा शेंडा दुपारी ते ३ वाजेपर्यंत झाडगाव येथे सहाणेवर जाऊन होळी उभी केली जाणार आहे. रात्री नऊ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीचे निशाण सहाणेवरून निघणार आहे.