जिल्ह्यात कोरोनाचा शिमगा; महिनाभरात रुग्णसंख्येने ओलांडला तीन हजारांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:58+5:302021-04-14T04:28:58+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरुवात होताच कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत जलद गतीने वाढ झाली. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरुवात होताच कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत जलद गतीने वाढ झाली. १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ रुग्ण वाढले तर १ ते १३ एप्रिल या कालावधीत तब्बल २२६८ नव्या रुग्णांची भर पडली असून महिनाभरातच रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. जानेवारी, फेब्रुवारी आणि १५ मार्चपर्यंत ही संख्या कमी होती. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग कमी होतोय, असा दिलासा नागरिकांबरोबरच आरोग्य यंत्रणेलाही वाटू लागला होता. मात्र, शिमगोत्सवात गावाला येणाऱ्या चाकरमान्यांमुळे हा धोका वाढणार आहे, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याकडून नागरिकांना सातत्याने देण्यात येत होत्या. मात्र, शिमगोत्सवासाठी बाहेरून येणारे आणि जिल्ह्यातीलही नागरिक यांच्याकडून दाखविण्यात आलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा धोका वाढला. परिणामी, रुग्णसंख्या भरमसाट वाढू लागली. १ ते १५ मार्च या कालावधीत २८७ असलेली संख्या १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ वर पोहोचली. १५ दिवसांत ५२१ नव्या रुग्णांची भर पडली. तर १ ते १३ एप्रिल या कालावधीत नव्या रुग्णसंख्येने दोन हजारांचाही टप्पा ओलांडला आहे. सध्या रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहता येत्या दोन दिवसांत ही संख्या अडीच हजारापर्यंत जाण्याचा धोका व्यक्त होत आहे. १८ मार्च २०२० ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीतील एकूण रुग्णसंख्या १२,९६० झाली असून रुग्णसंख्या अजूनही वेगाने वाढू लागली आहे.
शिमगोत्सवासाठी येणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने लसीकरण तसेच कोरोना चाचणी करून येणे बंधनकारक केले होते. मात्र, तरीही या नियमांचे उल्लंघन करून आलेले थेट घरात पाेहोचले. त्यामुळे महिनाभरात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. शिमगोत्सवाच्या काळात कोरोनाचा चढता आलेख पाहता १६ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत तब्बल ३,०५६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर अजूनही तपासणीसाठी पुढे येणाऱ्यांची संख्या कमी असल्याने कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
१८ मार्चपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांकडून कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला. त्यामुळे १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ इतकी झाली. तर १ ते १३ एप्रिल या कालावधीत २०५६ वर पोहोचली. १६ मार्चपासून आतापर्यंत तब्बल ३०५६ इतके रुग्ण वाढले.
पाॅइंटर
१ ते ३१ मार्च २०२० : १०५५
१६ ते ३१ मार्च : ७८८
१ ते १३ एप्रिल : २२६८
१६ मार्च ते १३ एप्रिल : ३०५६