आडिवरे गावातील महाकालीचा आगळावेगळा शिमगोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 04:10 PM2020-03-07T16:10:37+5:302020-03-07T16:11:40+5:30
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. गुरूवारी (५ मार्च) रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी मोगरे येथील होळी निश्चित करण्यात आली असून, १० मार्चला होळी उभी होणार आहे.
रत्नागिरी : राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. गुरूवारी (५ मार्च) रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी मोगरे येथील होळी निश्चित करण्यात आली असून, १० मार्चला होळी उभी होणार आहे.
शिमगोत्सव फाल्गुन शुद्ध दशमीला सुरु होतो आणि धुलिवंदनाला संपतो. या खेळाच्या सुरुवातीला म्हणजे फाल्गुन शुद्ध दशमीला रात्री गावातील व्यवस्थापक व अन्य ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमतात. यावेळी देवीला कौल लावण्याची प्रथा आहे. हे कौल लावण्याचे काम मंदिरातील देवीची पूजा करणारे गुरव करतात. देवीचा कौल मिळाल्यावर खऱ्या अर्थाने या खेळाला सुरुवात होते. कौल लागल्यानंतर देवतांवर गुलाल टाकून शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
त्यानंतर मंदिराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या छोट्या मंदिरासमोर जाऊन त्या देवतेला हाक मारण्याची प्रथा आहे. या मंदिराला चव्हाटा म्हटले जाते. रात्री पोफळ खेळवण्यास सुरुवात होते. पाचव्या रात्री म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या पहाटेला होम केला जातो. सहाव्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनला होळीचा सण साजरा करतात.