शिमगोत्सव आदेशात दर चार दिवसांनी बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:10+5:302021-04-01T04:32:10+5:30
चिपळूण : जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेले आदेश दर चार दिवसांनी बदलत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, ...
चिपळूण : जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेले आदेश दर चार दिवसांनी बदलत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली याबाबतची मते मांडली. शिमगोत्सवाबाबत नेमके काय आदेश आहेत, पालखी घरोघरी जाणार की नाही, गेल्यास सोबत किती माणसे असण्याला मान्यता आहे, याबाबतच्या निकषात सतत बदल होत आहे. या संभ्रमाच्या वातावरणामुळे काही वाद व संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पध्दतीचे आदेश देताना काहीतरी तारतम्य ठेवायला हवे, असे आमदार जाधव म्हणाले.
आवश्यकता वाटल्यास जिल्हाधिकारी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी व शिमगोत्सवाच्या परंपरा समजून घ्याव्यात. पहिल्या होळी आधीच शिमग्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यामध्ये सातत्याने बदल होत गेल्यास गोंधळ उडेल. तेव्हा ग्रामस्थांनी आपल्या परंपरेनुसार कार्यक्रम करावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजीही घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.