शासकीय निर्बंधाचे पालन करीत शिमगोत्सव शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 05:56 PM2021-03-29T17:56:08+5:302021-03-29T18:04:56+5:30
Holi Ratnagiri- कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध जारी केले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकांकडून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करीत शिमगोत्सव शांततेत साजरा करण्यात येत आहे. रविवारी मुख्य होळी तोडण्यात आली. सोमवारी सर्वत्र सकाळी होम करण्यात आला.
रत्नागिरी : कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध जारी केले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकांकडून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करीत शिमगोत्सव शांततेत साजरा करण्यात येत आहे. रविवारी मुख्य होळी तोडण्यात आली. सोमवारी सर्वत्र सकाळी होम करण्यात आला.
जिल्ह्यात फाक पंचमीपासून शिमगोत्सवास प्रारंभ झाला. जिल्ह्यात ११६७ सार्वजनिक तर ३०७९ खासगी होळ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या रूपे लावून सजविण्यात येतात. काही पालख्या फाकपंचमी नंतर तर काही होळी पौर्णिमेला ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडतात. पैकी काही पालख्या रंगपंचमीनंतर देवळात परतात. तर काही गावातून चैत्रीपर्यंत पालखी उत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे जिल्ह्यातील १३७७ ग्रामदेवतेच्या पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडल्या आहेत.
कोरोनामुळे यावर्षी पालखी घरोघरी येणार नसली तरी सहाणेवरच थांबणार आहे. सामाजिक अंतर ठेवून पालखी दर्शनाचे नियोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही शासनाच्या नियमावलींचे पालन करून शिमगोत्सव साजरा करण्यात येत आहे. होळीसाठी भाविकांकडून नारळ न स्वीकारता अवघ्या गावाचा एकच नारळ अर्पण करून गाऱ्हाणे घालण्यात आले. पोलीस प्रशासनाकडूनही उत्सवावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. महत्वपूर्ण देवस्थानाबाहेर पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.
श्री भैरीची रथातून ग्रामप्रदक्षिणा
बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव सुरू झाला असून, श्री भैरीदेव ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले आहेत. मात्र कोरोनामुळे पालखीची ग्रामप्रदक्षिणा रथातून सुरू आहे. पालखी नाचविण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दि.२ एप्रिल पर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून रात्री १२ वाजता पालखी श्री भैरी मंदिरात परतणार आहे.