रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला
By मनोज मुळ्ये | Published: August 23, 2024 06:33 PM2024-08-23T18:33:29+5:302024-08-23T18:34:21+5:30
महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा हाेतोय
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : राजकारण कधीही एकसारखे राहत नाही, ही बाब रत्नागिरी जिल्ह्यात आता प्रकर्षाने पुढे येत आहे. आधीच महायुती फारशी एकत्र नव्हती आणि लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेसेना आणि भाजपमधील ताण अधिकच वाढले आहेत. त्यातल्या त्यात गुहागर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर चारही मतदारसंघात शिंदेसेना आणि भाजपमध्ये वाद वाढलेले दिसतात. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष दोन वर्षांपूर्वी एकत्र आले. मात्र जिल्ह्यात अजूनही त्यांचे एकत्रीकरण झालेले नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेने पहिल्यापासून या जागेसाठी दावा केला होता. आधी ही जागा शिवसेनेकडेच असल्याने ती शिंदेसेनेसाठी सोडली जाईल, असे वाटत होते. मात्र उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झाल्यानंतर ही जागा अचानक भाजपसाठी सोडण्यात आली. हा शिंदेसेनेसाठी धक्का होता.
त्यातच या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तीन ठिकाणी महायुतीला मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे शिंदेसेनेने अपेक्षित साथ दिली नसल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळेच महायुतीतील तेढ वाढली आहे.
मित्रपक्षाकडून सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप खासदार नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी अनेकदा केला आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका पाहता विधानसभेला शिंदेसेनेच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी भाजप करत आहे का, अशी शंका येण्यास वाव आहे.
रत्नागिरीसारखेच चित्र राजापूर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातही आहे. महायुतीत लोकसभेला दक्षिण रत्नागिरीप्रमाणेच उत्तर रत्नागिरीतही वाद सुरू झाले. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यानच माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजप तोफ डागली होती.
दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून ढवळाढवळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केली होता आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. ते आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून काम करत असल्याचा आरोप कदम यांनी केला होता. माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर दापाेलीतील भाजप अधिक सक्रिय झाली आहे. त्यातूनच हा वाद पुढे आला आहे. गेल्या आठवड्यात या वादाने तोंड फाेडण्याची भाषा करेपर्यंतचे टोक गाठले आहे. त्यामुळे महायुतीतील ताण अधिकच वाढला आहे.
रामदास कदम यांच्या आरोपांना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे. रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने टीका केली, त्याचा परिणाम म्हणून भाजपकडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कदम यांचा निषेध करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेसेनेकडूनही जशास तसे उत्तर देण्याची भाषा वापरण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना होणारे हे वाद, ते मिटविण्यासाठी न हाेणारे प्रयत्न, स्थानिक पातळीवर दिले जाणारे खतपाणी हे सारे पाहता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत की काय, अशी शंका येत आहे. केवळ मंत्री उदय सामंत यांनीच वाद मिटविण्याची भूमिका घेतली. वरिष्ठ पातळीवरून मात्र प्रयत्न झाले नाहीत.