शिंदेसेनेने दापोली मतदारसंघातील उमेदवार बदलावा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 01:05 PM2024-10-04T13:05:57+5:302024-10-04T13:07:16+5:30
मंडणगड : भाजपा महायुतीतील सर्वच घटक पक्ष व महायुतीचा सन्मान करते; परंतु लोकसभेच्या निवडणुकीतील दापोली मतदारसंघातील साडेआठ हजार मतांची ...
मंडणगड : भाजपा महायुतीतील सर्वच घटक पक्ष व महायुतीचा सन्मान करते; परंतु लोकसभेच्या निवडणुकीतील दापोली मतदारसंघातील साडेआठ हजार मतांची पिछाडी ही विधानसभेकरिता जागा धोक्यात असल्याचे संकेत देते. त्यामुळे शिंदेसेनेने विधानसभेचा आपला उमेदवार बदलावा, याकरिता भाजपा आग्रही असल्याचे व तसे न झाल्यास त्याचा फटका महायुतीस निवडणुकीत बसेल, असे प्रतिपादन भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी मंडणगड येथे केले.
भाजपातर्फे गुरुवारी खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलते होते. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केदार साठे पुढे म्हणाले की, महायुतीतील शिंदेसेना हा मित्रपक्ष भाजपा कार्यकर्त्यांचा नेहमीच दुस्वास करत आहे. कोकणचे नेते रामदास कदम येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा शितासाठीही शिल्लक न ठेवण्याच्या वल्गना करत आहेत. त्यामुळे आमदार योगेश कदम यांनी भाजपासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. आम्ही त्यांचा मनमानी कारभार व चुकांवर खुल्या दिलाने टीका केली आहे; पण पक्ष व आमच्या नेत्यांचा अवमान पक्षाचे स्वाभिमानी कार्यकर्ते कधीही सहन करणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, प्रकाश शिगवण, स्मिता जावकर, भाऊ इदाते यांनीही मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी प्रस्ताविक केले, सूत्रसंचालन विश्वदास लोखंडे यांनी केले.
रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते
आम्ही पगारी नव्हे तर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमच्या पक्षाचा विस्तार करण्याचा आम्हाला अधिकार आहे. मतदारसंघात आम्ही लोकहिताची कामे करणार नाही व दुसऱ्यांनी केली तर आम्ही करून देणार नाही, ही नीती सोडा, असे आवाहन केदार साठे यांनी केले.