जहाजाच्या तुकड्यामुळे लाडघर किनारी खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:32 PM2019-11-30T13:32:07+5:302019-11-30T13:33:14+5:30
या लोखंडी अवजाराचा उपयोग प्लॅटफॉर्म म्हणून समुद्रात करत असावेत, असाही अंदाज या यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. मात्र, यात कोणत्याही प्रकारचा संशय नसल्याचे व कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले.
दापोली : दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनारी मोठ्या जहाजाचा लोखंडी भाग वाहून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी याची पाहणी केल्यानंतर यात काहीही संशयास्पद नसल्याचे जाहीर केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
तालुक्यातील लाडघर दत्त मंदिरानजीक सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांना हा वाहून आलेला महाकाय लोखंडी भाग नजरेस पडला. प्रथम ही बोट असल्याचा संशय काही लोकांना आला. ग्रामस्थांनी याबाबत तत्काळ पोलिसांना सूचना दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या वाहून आलेल्या लोखंडी भागाची पाहणी केली तसेच कस्टम अधिकाऱ्यांनादेखील याबाबत सतर्क केले. यावेळी भरतीच्या पाण्याने हा लोखंडी भाग किनाऱ्याला फेकला गेला. यानंतर सर्व यंत्रणा मिळून या लोखंडी भागाची पाहणी केली असता हा मोठ्या जहाजातून तुटून आलेला अथवा निकामी झाल्याने फेकून दिलेला लोखंडी भाग असावा, असा निष्कर्ष त्यांनी काढला.
या लोखंडी अवजाराचा उपयोग प्लॅटफॉर्म म्हणून समुद्रात करत असावेत, असाही अंदाज या यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. मात्र, यात कोणत्याही प्रकारचा संशय नसल्याचे व कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामस्थांनी तसेच मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.