शिर्के गुरुकुलचे विद्यार्थी रमले भडे येथे शेतीत
By admin | Published: July 21, 2014 11:36 PM2014-07-21T23:36:22+5:302014-07-21T23:38:09+5:30
उद्याचे शेतकरी : शेतीतील अनुभव घेत विद्यार्थ्यांनी साकारले प्रात्यक्षिक
रत्नागिरी : रत्नागिरीतील शिर्के गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच नजीकच्या भडे येथील शेती प्रक्षेत्रावर जाऊन माहिती घेतली.
कोकणात पावसाने सध्या जोर धरला आहे. गावोगावी शेतीची लगबग सुरु झाली. भात लागवडीखालील क्षेत्राच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे भारत देशातील लागवडीखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान आहे.
मात्र, कोकणातील शेतीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. कोकणातील लोक डोंगर उतारावर नाचणी, वरी, हरीक, भात यांसारखी पिके घेत असत. परंतु याचे प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत आहे. या कमी होणाऱ्या शेती क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुण वर्गाला शेतीकडे वळवणे गरजेचे आहे. यासाठी गुरुकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शेतीबाबत प्रत्यक्ष माहिती व्हावी, यासाठी भात लावणी हा उपक्रम गुरुकुलच्यावतीने दरवर्षी राबवला जातो. प्रत्यक्ष शेतात जाऊन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना शेतीबाबत माहिती दिली जाते. शेती कशी केली जाते, मशागत म्हणजे काय, ती कशी करतात, याचा अनुभव विद्यार्थ्यांना शेतात जाऊन दिला जातो.
यावर्षीही भातलावणी उपक्रम पार पडला. इयत्ता पाचवीचे विद्यार्थी लांजा, भडे गावातील शेतकरी नारायण तेंडुलकर यांच्या शेतावर, तर सहावीचे विद्यार्थी मेर्वी गावातील शेतकरी माधव अभ्यंकर यांच्या शेतावर लावणीसाठी गेले होते. अभ्यंकर यांच्याकडून रोपे कशी काढायची, हे शिकून रोपे काढली, शेतातील तण काढले, बांध घातले, पॉवर ट्रिलरचा उपयोग करुन जमीन नांगारली. यामुळे आधुनिक शेतातील भात नांगरणी यंत्राची माहिती मिळाली. नांगरणीनंतर चिखल सारखा केला व त्यानंतर त्या चिखलात विशिष्ट अंतरावर भाताची रोपे लावली. नंतर युरिया या खताची योग्य मात्रा देण्यात आली. यावेळी सह्याद्री हे बियाणे वापरले आहे. या उपक्रमातून आवड निर्माण होऊन गुरुकुलचे काही विद्यार्थी भविष्यात नक्कीच शेती व्यवसायाकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
-भारतीय कृषी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करताना येणारे अनुभव रोमांचक असतात. कष्टकरीवर्गाच्या या कृषी संस्कृतीचा अनुभव भडे येथे जाऊन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी घेतला. हे उद्याचे शेतकरी सधन कृषी संस्कृतीसाठी आतापासून प्रयत्न करीत आहेत.