Shiv Sena Anil Parab ED Raid : अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:08 PM2022-05-26T12:08:26+5:302022-05-26T12:11:30+5:30
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
दापोली : रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. मात्र रिसॉर्ट बंद असल्याने ते बराचवेळ बाहेरच थांबावं लागलं.
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. सीआरझेडचे उल्लंघन करून हे रिसॉर्ट बांधण्यात आले असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे होते. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्राच्या पर्यावरण विभागाचे एक पथक येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि ते पाडण्याचे आदेश देण्यात आले.
आता पुन्हा एकदा ईडीने या हॉटेलवर छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी या रिसॉर्टवर दाखल झाले. हे रिसॉर्ट आपण विकले असल्याचे अनिल परब यांनी याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
सोमय्यांची प्रतिक्रिया
शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापे टाकण्यात आले. अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापे टाकले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनीही तयार राहावे. तसेच अनिल परब यांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा, असं म्हणत सोमय्या यांनी निशाणा साधला.