लोकांमुळे शिवसेनेने भूमिका बदलली नीलेश राणे : रिफायनरीविरोधात ८ रोजी नारायण राणेंची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:21 PM2018-01-31T23:21:42+5:302018-01-31T23:22:52+5:30
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणारसहित १६ गावांमधील लोक अंगावर येत आहेत, हे लक्षात आल्यावर शिवसेनेने रिफायनरी प्रकल्पाबाबतची भूमिका बदलली. मात्र,
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणारसहित १६ गावांमधील लोक अंगावर येत आहेत, हे लक्षात आल्यावर शिवसेनेने रिफायनरी प्रकल्पाबाबतची भूमिका बदलली. मात्र, हा दिखावा असून सेनेची दुटप्पी भूमिका प्रकल्पग्रस्तांनीही ओळखली आहे, अशी सणसणीत टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली. येत्या ८ फेब्रुवारीला नाणार परिसरात प्रकल्पविरोधात जाहीर सभा होणार असून, त्यात नारायण राणे यांची तोफ धडाडणार आहे, अशी माहितीही त्यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
रिफायनरी प्रकल्पासाठी जागा दाखविणारे व त्यानंतर प्रकल्पाची अधिसूचना काढणारे हे सेनेचे मंत्री आणि स्थानिक खासदार, आमदारच आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबतही अशीच दुटप्पी भूमिका घेऊन सेनेने स्वार्थ साधला. मे २०१७ मध्ये
नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना सेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनीच जारी केली. ज्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी जात आहेत, त्यांना समृध्दी मार्गाप्रमाणेच भरपाई मिळावी यासाठी सेनाच आग्रही होती.
ज्या नाणार परिसरात हा प्रदूषणकारी प्रकल्प होऊ घातला आहे, तेथील १६ गावांपैकी १२ गावचे सरपंच हे शिवसेनेचे आहेत. असे असताना सेनेकडून रिफायनरीला विरोध झाला नाही. ज्यावेळी प्रकल्पाला विरोध करीत स्थानिक लोक अंगावर येऊ लागले, त्यावेळी सेना नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली. त्यानंतर रिफायनरी विरोधाची भूमिका सेनेने घेतली, मात्र ही भूमिकाच दिखावू आहे, असे राणे म्हणाले.
नाणारसह १६ गावांपैकी १२ गावचे सरपंच शिवसेनेचे आहेत. तेथे लॅण्ड माफिया घुसतातच कसे? तेथील जागा खरेदी, विक्रीच्या व्यवहारात सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेच आघाडीवर आहेत. त्यामुळे सेनेची दुटप्पी भूमिका आता आणखी उघडी पडणार आहे. सेनेला जनतेच्या हिताशी कोणतेही देणेघेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.
रिफायनरीविरोधात लढणाºया लोकांच्या पाठीशी स्वाभिमान पक्ष ठामपणे उभा राहिला आहे. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी रिफायनरीविरोधात नाणार परिसरात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची जाहीर सभा होणार आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, ही पक्षाची भूमिका असल्याचे राणे म्हणाले.
राणेंवरील टिकेने काहीच साध्य होणार नाही
सेनेची दुटप्पी भूमिका समोर येत असताना त्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करीत सुटले आहेत. त्यातून सेनेला काहीही साध्य करता येणार नाही, असा टोलाही नीलेश राणे यांनी लगावला.
केसरकर रिफायनरीचे समर्थक?
रत्नागिरीच्या जिल्हा नियोजन सभेत रिफायनरीविरोधात ठराव केला गेला आहे. तर सिंधुदुर्गच्या जिल्हा नियोजन बैठकीत रिफायनरीविरोधात ठराव करता येणार नाही, शासनाच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही, असे सांगून तेथील पालकमंत्री दीपक केसरकर हे रिफायनरी प्रकल्पाचे समर्थनच करीत आहेत.
रत्नागिरीत रिफायनरीविरोधात ठरावकरणारे सेनेचेच लोकप्रतिनिधी आहेत व सिंधुदुर्गचे पालकमंत्रीही सेनेचेच आहेत. मग हा विरोधाभास कशासाठी, असा सवालही राणे यांनी केला.