मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल कृतज्ञता, 'बॅनर'वर उद्धव ठाकरेंचा फोटो; चिपळूण शहर प्रमुखांचा बॅनर चर्चेत
By संदीप बांद्रे | Published: July 22, 2022 02:47 PM2022-07-22T14:47:31+5:302022-07-22T15:21:40+5:30
शहर प्रमुख सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा फलक उभारल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
संदीप बांद्रे
चिपळूण : तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणीत बदल देखील केले आहेत. असे असतानाच चिपळूणच्या शहर प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लावलेला बॅनर चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या बॅनर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखील फोटो आहेत.
चिपळूणचे शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी नगर परिषदेसमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ जुलै २०२१ मधील महापुराच्या वेळी रुग्णवाहिकेसह वस्तू व साहित्य स्वरूपात चिपळूणला केलेल्या मदतीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा बॅनर उभारला आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांचे फोटो असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन शिंदे गटाने राज्यात भाजप सोबत सत्ता स्थापन केली. या घडामोडीनंतर शिवसेना अक्षरशः हादरून गेली आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणातही उलथापालथ सुरू झाली. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार उदय सामंत व योगेश कदम हे दोघेही शिंदे गटात सहभागी झाले. या घटनेने शिंदे गटाला मोठे बळ मिळालेले असतानाच या भागातील सर्वसामान्य शिवसैनिक गोंधळून गेला आहे.
शिवसैनिकाला सावरून घेण्यासाठी माजी केंद्रीय मत्री अनंत गिते यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच रत्नागिरी व चिपळूण येथे नुकताच मेळावे घेतले. या मेळाव्यात गद्दारांना बाटली बंद करण्याची शपथ घेण्यात आली. मात्र आता शहर प्रमुख सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा फलक उभारल्याने त्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
चिपळूण नगर परिषदेसमोरील कै. खेडेकर क्रीडा संकुलाच्या ठिकाणी भर बाजारपेठेत हा फलक उभारल्याने तो तितकाच लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे आता या विषयी शिवसेनेची कोणती प्रतिक्रिया समोर येते व सर्वसामान्य शिवसैनिक या बहुचर्चित बॅनरचा काय अर्थ लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.