रत्नागिरीत शिवसेनेने बंद पाडली दुकाने, अकराजणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 12:56 PM2020-12-08T12:56:55+5:302020-12-08T12:58:59+5:30
Bharat Bandh, Farmer strike, Ratnagiri, Police शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत उघडलेली दुकाने शिवसैनिकांनी सक्तीने बंद केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सक्तीमुळे व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी : शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत उघडलेली दुकाने शिवसैनिकांनी सक्तीने बंद केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सक्तीमुळे व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवार ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या बंदला देशभरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रातही सकाळपासून कडकडीत बंदला सुरुवात झाली आहे.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी कांदा, मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे मंगळवारी रत्नागिरीत भाजीपाल्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
माथाडी कामगारही काम बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. तर शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा म्हणून शिवसेना पुरस्कृत रिक्षा संघटना संपात उतरली आहे. मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेतील दुकाने उघडण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, नगरसेवक निमेश नायर, विजय खेडेकर, संजय साळवी, बंटी कीर आदी शिवसैनिक बाजरपेठेतील दुकाने बंद करण्यासाठी फिरत होते. बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेतील दुकाने सक्तीने बंद करण्यास भाग पाडली.
दरम्यान, या संपात सहभागी होण्याचा निर्णय ऐश्चिक ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी आपली दुकाने उघडली होती. शिवसैनिकांनी ही दुकाने बंद करण्यास भाग पाडले. शहरात दुकाने बंद करण्यासाठी फिरणाऱ्या ११ शिवसैनिकांवर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा ६८ अन्वये ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी दिली.