रत्नागिरी शिवसेनेत सध्या घडतंय बिघडतंय, पक्ष सोडून जाणाऱ्यांना थोपविण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 02:04 PM2022-07-19T14:04:29+5:302022-07-19T14:06:10+5:30
भास्कर जाधव राजन साळवी या दाेन आमदारांवरच आता जिल्ह्यातील शिवसेनेत हाेणारी पडझड राेखण्याची जबाबदारी
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवत वेगळा गट तयार केला आहे. या गटात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापाेलीचे आमदार याेगेश कदम सामील झाले आहेत. त्यांचे समर्थन करत अनेकजण त्यांच्यासाेबत जात आहेत. त्यामुळे शिवसेनेत सध्या हलचल निर्माण झाली आहे. समर्थन करणाऱ्यांची उचलबांगडी केली जात आहे, तर पक्षातून काेणी जाऊ नये, यासाठी पदाधिकारी एकवटले आहेत. पक्षात सारे काही चांगले घडतंय, असे वाटत असतानाच पुन्हा सारे बिघडत असल्याने पदाधिकारीही संभ्रमात पडले आहेत.
आमदार सामंत यांचे समर्थकही शिंदे गटाच्या दिशेने चालले आहेत. शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि आमदार सामंत समर्थकांनी त्यांच्या दाैऱ्यात हजेरी लावली. त्यामुळे उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला आघाडी संघटक कांचन नागवेकर यांना पदावरुन हटविण्यात आले. त्यांच्या जागी नव्याने नियुक्तीही झाली. मात्र, नियुक्ती हाेताच प्रकाश रसाळ यांनी उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला, तर तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनीही पद साेडले आहे.
पक्षात नव्याने नियुक्त्या करुन पक्ष सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पक्षातून बाहेर जाणाऱ्यांना थाेपविण्याचे आव्हान पक्षासमाेर आहे. शिवसेनेचा गड आता अबाधित ठेवण्याची जबाबदारी शिलेदारांवर येऊन पडली आहे. पक्षाला सावरण्यासाठी जुने शिवसैनिक एकवटले आहेत. पक्षात सारे बिघडत असतानाच आता सावरण्यासाठी धडपड सुरु आहे.
गड राखणे आव्हान
आमदार सामंत आणि आमदार कदम यांना मानणारा गट आहे. ते त्यांच्यासाेबतच जाणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे हे गड राखण्याचे आव्हान शिलेदारांवर आहे. या मतदार संघातील घडामाेडींचा बाजूच्या मतदार संघांवरही परिणाम हाेण्याची चिन्हे आहेत.
नाेंदणीचे शिवधनुष्य
रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या चार तालुक्यात एक लाख सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय घडामाेडीत सदस्य नाेंदणीचे हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. नाेंदणी केलेले कितीजण मनाने पक्षासाेबत राहणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नगरसेवक संपर्कात
शिवसेनेचे काही नगरसेवकही सामंत यांच्या बाजूने आहेत. त्यांनी दाैऱ्यात हजेरी लावल्याने हे नगरसेवक पक्षाच्या रडारवर आहेत. यापूर्वी दापाेली, मंडणगडातील अपक्ष नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. हे मूळचे शिवसैनिक आहेत. आता नगरसेवकही सामंत यांच्या साेबत जाण्याच्या तयारीत आहेत.
यांच्यावर सारी भिस्त
जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार म्हणून उत्तर रत्नागिरीत भास्कर जाधव आणि दक्षिण रत्नागिरीत राजन साळवी कार्यरत आहेत. हे दाेन्ही आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच साेबत राहिले आहेत. त्यामुळे या दाेन आमदारांवरच आता जिल्ह्यातील शिवसेनेत हाेणारी पडझड राेखण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यांच्यावरच आता सारी भिस्त आहे.