रत्नागिरीत शिवसेनेला खिंडार?, राजेश सावंत, नदीम सोलकर, भय्या मलुष्टेंसह अनेकांचा भाजप प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:39 PM2018-01-23T15:39:57+5:302018-01-23T15:50:21+5:30

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष विनय तथा भय्या मलुष्टे, सेनेचे नदीम सोलकर यांच्यासह सेनेतील व अन्य पक्षांतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी डोंबिवली मुंबई येथे भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात खिंडार पडल्याचा दावा भाजपने केला आहे.

Shiv Sena Khandar in Ratnagiri ?, Rajesh Sawant, Nadeem Solkar, Bhayya Baluchan | रत्नागिरीत शिवसेनेला खिंडार?, राजेश सावंत, नदीम सोलकर, भय्या मलुष्टेंसह अनेकांचा भाजप प्रवेश

रत्नागिरीत शिवसेनेला खिंडार?, राजेश सावंत, नदीम सोलकर, भय्या मलुष्टेंसह अनेकांचा भाजप प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरीत शिवसेनेला खिंडार?राजेश सावंत, नदीम सोलकर, भय्या मलुष्टेंसह अनेकांचा भाजप प्रवेश- राजेश सावंत व अन्य नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार असल्याचा विश्वास.- मुंबई-डोंबिवली येथे झाला भाजपमध्ये रत्नागिरीतील अन्य पक्षांच्या नेत्यांचा प्रवेश.भाजपमधील प्रवेश ही तर निवडणूकीपूर्वीची नांदी, मोठा प्रवेश सोहळा यानंतर होणार. रत्नागिरी मतदारसंघात भाजपची राजकीय ताकद वाढणार.

रत्नागिरी : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष विनय तथा भय्या मलुष्टे, सेनेचे नदीम सोलकर यांच्यासह सेनेतील व अन्य पक्षांतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी डोंबिवली मुंबई येथे भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात खिंडार पडल्याचा दावा भाजपने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सेनेतील काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. सोमवारी या पदाधिकाऱ्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे या चर्चेवर आता पडदा पडला आहे. मात्र, मूळ सेनेतील या पदाधिकाऱ्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार असल्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपमधील सोमवारी झालेला पक्षप्रवेश ही केवळ नांदी आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधूनही मोठ्या प्रमाणात नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती भाजप सुत्रांकडून देण्यात आली.

रत्नागिरीचे डॉ. अभय धुळप, राजा हेगिष्टे, सुनील गझने, रामदास शेलटकर, दीपक मोरे, शरद पाटील, पिंट्या साळवी यांनीही सोमवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाळ माने, प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार विनय नातू, महामंत्री सतीश धोंड, भाजप प्रदेश सदस्य सचिन वहाळकर, भाजप तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता देसाई, नगरसेवक व शहर सरचिटणीस भाजप उमेश कुळकर्णी, नाना शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

गेल्याच आठवड्यात भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या रत्नागिरी मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांशी चव्हाण यांनी चर्चा केली होती. राजेश सावंत यांच्या रत्नागिरीतील बंगल्यावर बराच काळ इच्छुकांशी चर्चा झाली.

त्यामध्ये माजी नगराध्यक्षांचाही समावेश होता. मात्र, त्यावेळी उपस्थित असलेल्या काहीजणांनी सोमवारी डोंबिवली येथे हजर असूनही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांचा भाजप प्रवेश नंतर होणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत झालेला हा पक्षप्रवेश प्रातिनिधिक स्वरुपाचा होता. भाजपमध्ये येण्यास शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात रत्नागिरीत भाजप प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

सोमवारी पक्ष प्रवेश केलेले सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत हे एककाळ सध्याचे सेना आमदारर उदय सामंत यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. सेनेच्या निवडणूक निर्णय प्रक्रियेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी भाजपकडून दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. सावंत यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे रत्नागिरीतून उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता आहे.

सेनेचे पंचायत समितीचे माजी सदस्य नदीम सोलकर यांना गेल्यावेळी पंचायत समितीची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे ते नाराज होते. त्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा बोलबाला होता.

त्यामुळेच सोलकर यांनीही भाजपचा रस्ता धरल्याचे सांगितले जात आहे. पिंट्या साळवी, माजी उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने रत्नागिरी शहरात भाजप आता आणखी मजबूत होणार असल्याचा दावा केला जात आहे.

बाळ माने या ना माने?

राजेश सावंत यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्हाध्यक्ष बाळ माने हे नाराज असल्याने त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजिनामा दिल्याची चर्चा आज दिवसभर रत्नागिरीत होती. मात्र राजेश सावंत यांच्यासह अनेकांचा भाजप प्रवेश सोमवारी मुंबईत झाला. त्यावेळी बाळ मानेही उपस्थित होते. त्यांच्या राजिनाम्याची चर्चा ही निराधार होती, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena Khandar in Ratnagiri ?, Rajesh Sawant, Nadeem Solkar, Bhayya Baluchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.