..त्यामुळे नाणार, बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:41 PM2023-01-17T12:41:44+5:302023-01-17T12:42:21+5:30
४० आमदार जे विकास करायला गेलेत यांची बुद्धी घाण पडली आहे. तुम्हीच मंजूर केलेल्या कामांना स्टे दिला जातो. तरीही शिंदे गटाचे मंत्री गप्प का?
दापोली : भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत. त्यामुळे नाणार आणि बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत. भाजपचे केंद्रात सरकार आहे, त्यांना हे प्रकल्प करणे केव्हाही सहज शक्य आहे. मात्र, विरोधाचे थातूरमातूर कारण देऊन भाजपचे राजकारण सुरू आहे, असा आराेप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केला.
दापोली तालुका भगवा सप्ताहनिमित्त ते साेमवारी (१६ राेजी) दापोलीत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लाखो तरुणांच्या रोजगाराचा घास पळविण्याचे काम सरकारने केले. अखंड देश, महाराष्ट्र जेव्हा कोविडशी लढत होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त राजकारण करत होते.
सकाळ - संध्याकाळ पत्रकार परिषदा घेऊन चांगले काम करणाऱ्या माणसाचे केवळ खच्चीकरण करण्याचे काम भाजपने सुरू ठेवले होते, असा आराेप भास्कर जाधव यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, लाखो कोटींचे प्रकल्प बाहेर पाठवायचे आणि ३०० कोटींचा प्रकल्प आणायचे एवढेच काम शिंदे-फडणवीस सरकारने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना गुजरात सोडून इतर ठिकाणी मोठा प्रकल्प द्यायचे नाहीत, असे सांगितले. त्यांना महाराष्ट्राला प्रकल्प द्यायचे नाहीत एवढं त्यांचे हृदय मोठे नाही, असा आराेपही जाधव यांनी केला.
महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती दुबळी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सतत सुरू आहे. राज्यातील प्रकल्प बाहेर घालवून मुख्यमंत्री दाओसला गेलेत, तिथे जाऊन आता काहीच फायदा होणार नाही. झालाच तर आम्ही तुमचे स्वागत करतो. दाओसला ते केवळ पर्यटन भेट म्हणून जाऊन येतील. त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
जाधव म्हणाले, अनेक प्रकल्प येऊ पाहत आहेत. परंतु, त्यांना कोणताही प्रकल्प आणायचा नाही. फक्त शिवसेनेला बदनाम करायचे एवढेच सुरू आहे. प्रकल्प आणायचे असेल तर आणा, वर्षात एकही प्रकल्प येथे आणला नाहीच; पाणी योजना पण आणली नाही, असा आराेप त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ४० आमदार जे विकास करायला गेलेत यांची बुद्धी घाण पडली आहे. तुम्हीच मंजूर केलेल्या कामांना स्टे दिला जातो. तरीही शिंदे गटाचे मंत्री गप्प का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.