कोकणातील राजकीय वातावरण तापलं, शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला; शिवसैनिक आक्रमक
By संदीप बांद्रे | Published: October 19, 2022 01:50 PM2022-10-19T13:50:45+5:302022-10-19T14:03:10+5:30
मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर भ्याड हल्लाची घटना घडल्याने उडाली खळबळ
चिपळूण : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या पाग येथील बंगल्यावर भ्याड हल्ला झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत संशयितांना ताब्यात घेतलं जात नाही, तोपर्यंत पोलीस स्थानकात ठिय्या मांडून बसणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. या घटनेमुळे चिपळूण पोलीस स्थानकाच्या आवारात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून शिवसेना नेते भास्कर जाधव व माजी खासदार निलेश राणे हे सातत्याने एकमेकांवर पातळी सोडून टीका करत आहे. सोमवारी चिपळूण येथील भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवत तोंडसुख घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिंधुदुर्ग येथे भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. या सभेत जाधव यांनी राणे पिता-पुत्रांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र त्यानंतर प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातच बुधवारी मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली. जाधव यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टम्प आढळल्या.
या घटनेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रमुख सचिन कदम, बाळा कदम, संदीप सावंत, फैसल कास्कर, मोहन मिरगल, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत शाह यांच्या नेतृत्वाखाली येथील पोलिसांवर धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना घेराव घालण्यात आला.
अचानक बंदोबस्त का हटवला?
भास्कर जाधव यांच्या घराच्या ठिकाणी दोन पोलीस कॉन्स्टेबल कायम बंदोबस्तासाठी ठेवले होते. परंतु रात्री अचानक बंदोबस्त का हटवण्यात आला, कोणाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, अशा प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारला. तसेच या हल्ल्यामागे असलेल्यांना तात्काळ ताब्यात घ्या, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त काढून घेणे व देणे आपल्या अखत्यारीत नाही. तरी देखील या हल्ल्याची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र शिवसैनिकांनी संशयितांना ताब्यात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.
सिंधुदुर्गातील घटनेनंतर येथे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याची कल्पना काल, मंगळवारी पोलिसांना देण्यात आली होती. त्याप्रमाणे दोन पोलीस कॉन्स्टेबल बंदोबस्तासाठी ठेवले होते. मात्र रात्री दीड वाजता हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल तेथून निघून गेले. त्यानंतर हल्ल्याचा प्रकार घडला आहे. जाणीवपूर्वक महिला पोलीस बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले. याउलट भाजपच्या बंद कार्यालयासमोर बारा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचाच अर्थ पोलीस यंत्रणा कोणाच्यातरी दबाव खाली काम करीत आहेत. - विक्रांत जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष