शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 09:29 AM2022-10-20T09:29:19+5:302022-10-20T09:29:44+5:30
संशयितांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक, पोलीस ठाण्यात ठिय्या
चिपळूण (जि. रत्नागिरी) : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या येथील बंगल्यावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत संशयितांना ताब्यात घेतले जात नाही, तोपर्यंत पोलीस स्थानकात ठिय्या मांडून बसण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून भास्कर जाधव व माजी खासदार नीलेश राणे हे सातत्याने एकमेकांवर टीका करत आहे. सोमवारी चिपळूण येथील भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नीलेश राणे यांनी जाधव यांच्यावर टीकेची झोड उठविली. दुसऱ्याच दिवशी सिंधुदुर्ग येथे शिवसेनेच्या एका मोर्चादरम्यान भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांचा जोरदार समाचार घेतला. मात्र, त्यानंतर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जाधव यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे आरोप-प्रत्यारोप सलग सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला. त्यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टंम्प आढळल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
कुडाळमध्ये गुन्हा दाखल
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याची तक्रार भाजपचे दादा साईल यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
- त्यानुसार आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.