जे गेले त्यांचे बाेलवते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, खासदार विनायक राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 07:07 PM2022-07-11T19:07:15+5:302022-07-11T19:08:37+5:30
शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील
रत्नागिरी : उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर अजूनही आपली तारीख नाही. शिवसेनेचे धनुष्य पळवणारे अजूनही जन्माला आलेले नाहीत. शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील. गेले त्यांचे बोलावते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात रविवारी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, प्रदीप बोरकर, सहजिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
एका माणसाला मी शोधतोय, राजन साळवींचा सत्कार करायला येणार होता. गद्दारांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. पक्ष साेडून गेलेले आता आम्ही शिवसेनेचे असे सांगायला लागले आहेत. अशी टिकाही खासदार राऊत यांनी केली. यापुढे कोणत्याही गद्दराला शिवसेनेत प्रवेश नाही असे जाहीर केले.
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लक्ष्य करत ते म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर आरोप करून गेले तरी ते म्हणताहेत आम्ही शिवसैनिक.
आपले पणाच्या भावनेने तुम्हाला जवळ केले. मातोश्रीवर स्वतःच्या हाताने बनवलेले अन्न घातलेे. म्हाडाचे पद दिले, मंत्री केले. आदित्य ठाकरे यांनी फक्त उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासह फिरले. मातोश्रीच्या अन्नाची पण किंमत का नाही ठेवली. ज्या शिवसेनेने राजकीय अस्तित्व दिले, त्याच शिवसेनेला संपवायची भाषा हे करत आहेत. अशी अनेक बंड आम्ही पाहिली आहेत. हिंमत असेल तर राजीनामा द्या, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ज्यावेळी उध्दव ठाकरेंना आधारची गरज होती, त्यावेळी हे पळून गेले. कोणत्या अधिकारात राजन साळवींच्या सत्काराला यायची वक्तव कराल, असेही खासदार विनायक राऊत यांनी ठणकावले.
आमदारकी बाळासाहेबांच्या चरणी : राजन साळवी
उदय सामंत २०१४ मध्ये शिवसेनेत आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे डोक्यात ठेवूनच शिवसेनेचा एक आमदार म्हणून सामंत आमदार झाले. पुढे ते म्हाडा अध्यक्ष, उपनेते आणि कॅबिनेट मंत्रीही झाले. यावेळी माझ्यावर अन्याय झाला, पण निष्ठा शिवसेनेशी आहे. आता आमदारकी गेली तरी चिंता नाही, ती बाळासाहेबांच्या चरणाशी अर्पण करतो, असे आमदार राजन साळवी म्हणाले.