कट्टर शत्रूशी जुळवून घ्यायचे कसे; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 04:36 PM2021-12-15T16:36:50+5:302021-12-15T16:37:32+5:30

खेड तालुक्यात शिवसेना अधिक सक्षम आहे आणि आतापर्यंत राष्ट्रवादीच शिवसेनेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी मैत्री करण्याबाबत शिवसैनिकांमध्ये संभ्रम

Shiv Sena NCP alliance in Khed taluka | कट्टर शत्रूशी जुळवून घ्यायचे कसे; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

कट्टर शत्रूशी जुळवून घ्यायचे कसे; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

Next

हर्षल शिराेडकर

खेड : एकतर खेड तालुक्यात शिवसेना अधिक सक्षम आहे आणि आतापर्यंत राष्ट्रवादीच शिवसेनेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी मैत्री करण्याबाबत शिवसैनिकांमध्ये संभ्रम असून, ही मैत्री शिवसेनेला तोट्याची ठरणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ पासून दापोली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात खेड शहर एक महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरले आहे. खेड मतदार संघ विसर्जित होऊन सात जिल्हा परिषद गटांपैकी साडेतीन जिल्हा परिषद गट दापोली विधानसभा मतदारसंघात विलीन करण्यात आले. यामुळे २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय पराजयाच्या गणितात प्रभाव दिसून आला होता.

राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येत असलेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी अजूनही याच दोन पक्षांतील अनेकांच्या पचनी पडलेली नाही. स्थानिक पातळीवरील शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या आघाडीबाबत अद्यापही संभ्रमात असून, गेली अनेक वर्षे ेग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर ठाम विरोधात काम केलेल्या लोकांसोबत नगरपंचायत निवडणुकीमध्ये हातात हात घालून काम करण्याची या पदाधिकाऱ्यांची तयारी नसल्याचे चित्र दिसत आहे.

सद्यस्थितीत दापोली मतदारसंघांमध्ये दापोली व मंडणगड या दोन ठिकाणी नगरपंचायत निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी जोरदार टक्कर होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता तेच पक्ष हातात हात घालून उभे आहेत. ज्यांच्याशी वाद झाल्याने संजय कदम यांनी शिवसेना सोडली, त्याच सूर्यकांत दळवी यांच्याशी त्यांना नव्याने जुळवून घेण्याची वेळ आली आहे. शिवसेनेतून बंड केलेले संजय कदम हे राष्ट्रवादी स्थिरावले असले तरी बंडाचा झेंडा गेल्या सात वर्षांपासून हातात धरून वावरत असलेले सूर्यकांत दळवी हे कधी भाजपच्या नेत्यांसोबत तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर आढळले आहेत.

शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललेले संजय कदम यांची मात्र त्याच भूमिकेतून वाटचाल सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही व राज्य पातळीवर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी झाल्यावरही माजी आमदार कदम यांनी त्यांच्या भूमिकेत तसूभरही बदल केलेला आढळला नाही. परंतु, राज्यपातळीवर झालेल्या आताच्या आघाडीमुळे संजय कदम यांना शिवसेनेशी जुळवून घ्यावे लागत आहे.

ज्यांच्याशी कायम संघर्ष केला, त्यांच्याशी जुळवून घेण्यात शिवसैनिकांसमोर अडचणी आहेत. त्यातच शिवसेना अधिक सक्षम असल्याने राष्ट्रवादीशी आघाडी करण्यात शिवसेना मागे येण्याची अटकळ बांधली जात आहे.

 ‘त्या’ व्हिडिओचीच चर्चा

शिवसेनेचे कट्टर विरोधक भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संघर्ष यात्रेदरम्यान भरणे येथील सभेच्या व्यासपीठावर बसून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सूर्यकांत दळवी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शिवसैनिकांमध्ये त्याचीच चर्चा अधिक आहे.

Web Title: Shiv Sena NCP alliance in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.