शिवसेना पंचायत समिती सदस्याचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:28+5:302021-04-01T04:32:28+5:30
चिपळूण : चिपळूण पंचायत समिती सभापतीपदाची निवड १ एप्रिल रोजी होत असून, निवडीच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेतील असंतोष उफाळून आला. पक्षाकडून ...
चिपळूण : चिपळूण पंचायत समिती सभापतीपदाची निवड १ एप्रिल रोजी होत असून, निवडीच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेतील असंतोष उफाळून आला. पक्षाकडून विश्वासात घेत नसल्याने शिवसेनेतील रामपूर गणाच्या सदस्या अनुजा चव्हाण यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला. जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख त्यांना हवे तसे राजकारण करतात. पक्ष नेतृत्वाने याची दखल न घेतल्यास सभापती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही सदस्या चव्हाण यांनी दिला आहे.
राजीनाम्याबाबत पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या सदस्या अनुजा चव्हाण म्हणाल्या की, प्रतिकूल स्थितीत रामपूर गणातून मी विजयी झाले. मात्र गेल्या चार वर्षांत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कधी विश्वासात घेतले नाही. चार वर्षांपूर्वी झालेल्या सभापती निवडीवेळी पुढच्या वेळी तुम्हाला संधी देऊ, असा शब्द नेत्यांकडून मिळाला होता. मात्र तो पाळला गेलेला नाही. त्यामुळे आपण सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजीनाम्याची माहिती पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांना राजीनाम्याची माहिती सांगितली असता, ते म्हणतात, मी तुमचा तालुकाप्रमुख नाही. तुमच्याकडील ७२ गावांचे तालुकाप्रमुख संदीप सावंत आहेत. त्यांच्याकडे राजीनामा द्या. राजीनामा का देताय हे विचारण्याची तसदीही तालुकाप्रमुख घेत नाहीत, हे पक्षातील कार्यकर्त्यांचे दुर्दैव आहे. पदाधिकारी निवडीत मातोश्रीचे आदेश आम्हाला मान्य आहेत. मात्र स्थानिक स्तरावर येथील पदाधिकारी आपल्याला हवे तसे राजकारण करतात. राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवार आमच्याशी संपर्क साधून मतदान अथवा सहकार्यासाठी तालुकाप्रमुखांचा फोन येईल असे सांगतात. यावरूनच सर्वकाही समजते आहे. गुरुवारी सभापती, उपसभापतीपदाची निवड होत आहे. या निवडीबाबत अद्याप तालुकाप्रमुख असो वा जिल्हाप्रमुख कोणीही संपर्क साधलेला नाही. निवडीसंदर्भात सदस्यांची संयुक्त बैठकही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सदस्य नाराज असले तरी ते कारवाईच्या भीतीने थेट नाराजी व्यक्त करीत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख स्वतःला सोयीचे राजकारण करतात. ते विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे नाराजीतून आपण राजीनामा देत असल्याचे अनुजा चव्हाण यांनी सांगितले. प्रभारी सभापती पाडुरंग माळी यांच्याकडे राजीनामा दिला आहे. दखल घेतली तर सभापती निवडणुकीत सहभागी होऊ, अन्यथा त्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
हे आहेत आक्षेप
जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आपल्याला हवे ते करतात
सदस्यांना विश्वासात घेतलेच जात नाही
सभापती निवडीबाबत सदस्यांची बैठकही लावली नाही