शिवसेनेने वाशिष्ठी पुलावरून फुकटचे श्रेय घेऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:36 AM2021-09-05T04:36:09+5:302021-09-05T04:36:09+5:30
भाजप शहराध्यक्ष आशिष खातू यांनी लगावला टोला लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील ...
भाजप शहराध्यक्ष आशिष खातू यांनी लगावला टोला
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल सुरू व्हावा, ही समस्त चिपळूणकर व कोकणवासीयांची मागणी होती. गणेशोत्सवापूर्वी या पुलावरील वाहतूक सुरू झाली, ही आनंदाची बाब आहे. मात्र, यामध्ये शिवसेनेने पुढाकार घेत भाजपला टाळत श्रेयवादाचे राजकारण केले आहे, असे मत भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या वाशिष्ठी पुलाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. चिपळुणात चौपदरीकरणातील वाशिष्ठी नव्या पुलाचे काही वर्षांपासून काम रखडले होते. त्यातच जुना पूल धोकादायक बनल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे घाईघाईने या पुलाचे अनौपचारिक उद्घाटन शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, केंद्रात सत्ता असलेले भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी अनुपस्थित होते.
याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर म्हणाले की, सकाळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम यांनी संपर्क साधून साडेदहा वाजता बहादूरशेख नाका येथील नव्या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला येण्याचे अचानक निमंत्रण दिले. मात्र, आपण कामानिमित्त शहराबाहेर असल्याने तत्काळ त्याठिकाणी पोहोचू शकलो नाही. दि. ४ सप्टेंबरला अनौपचारिक उद्घाटन करण्याचे सेना पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी ठरवले होते. त्याआधी २ सप्टेंबरला उद्घाटन करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, काही कारणास्तव ते लांबणीवर गेले. भाजपला टाळून त्यांना उद्घाटन करायचे होते, त्यामुळेच आयत्यावेळी आम्हाला उद्घाटन कार्यक्रमाचा निरोप देण्यात आला.
शहराध्यक्ष आशिष खातू म्हणाले की, वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन जुना पूल धोकादायक झाल्याने नवीन पुलावरील वाहतूक तातडीने सुरू होण्याची आवश्यकता होती. गणेशोत्सवापूर्वी हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी सुरू झाला ही चांगली गोष्ट आहे. मात्र, इतक्या घाईगडबडीत श्रेयवादासाठी पुढाकार घेऊन उद्घाटन करण्याची शिवसेनेला गरज नव्हती. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग त्वरित पूर्ण व्हावा, यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. वाशिष्ठीच्या नवीन पुलासाठीही गडकरी यांचे मोठे योगदान आहे, हे जनतेलाही ज्ञात आहे. त्यामुळे शिवसेनेने कितीही श्रेयवाद करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेने या पुलावरून फुकटचे श्रेय घेऊ नये, असा टोलाही खातू यांनी लगावला.