खेडमधील सभेस गर्दी जमवण्यात शिवसेना झाली पास, पण...
By मनोज मुळ्ये | Published: March 21, 2023 07:25 PM2023-03-21T19:25:35+5:302023-03-21T19:35:49+5:30
रामदास कदम यांची जोरदार बॅटिंग
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : मोठा गाजावाजा झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यात शिवसेना पास झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला झालेली गर्दी मोठी होती. अर्थात उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठीच्या या सभेत बहुतांश वक्त्यांचा भर ठाकरे यांच्यावर टीका करण्यावरच होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचा राष्ट्रवादी व काँग्रेससोबत जाण्याच्या निर्णयाबाबत तर रामदास कदम यांनी ठाकरे यांनी आपल्याला संपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाच पाढा पुन्हा वाचला.
उद्धव ठाकरे यांनी ५ मार्च रोजी खेडमधील गोळीबार मैदानावर सभा घेतली. मूळचे शिवसेनेचे आणि नंतर राष्ट्रवादीतून आमदार झालेल्या संजय कदम यांचा पक्षप्रवेश त्या सभेचा मुख्य हेतू होता. थोडक्यात, विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार यांच्याविरूद्ध रणशिंग फुंकण्याचाच तो प्रयत्न होता. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सभांप्रमाणेच चोर, मिंधे, गद्दार, खोके अशी विशेषणे वापरून टीका केली. ही सभा झाल्यानंतर लगेचच माजी मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर टीका केली आणि याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेची घोषणाही केली.
रामदास कदम यांनी केलेल्या घोषणेनुसार रविवार, १९ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. ‘त्याच मैदानावर निष्ठावंतांचा एल्गार’ असे फलक केवळ खेडच नाही तर दापोली, मंडणगड, चिपळूण, रत्नागिरीतही झळकले. या सभेचा रोख उद्धव ठाकरे यांच्यावर असणार हे निश्चित होते. तशी चर्चाही समाजमाध्यमांमधून सुरू होती. प्रत्यक्षात तसेच झाले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर या दोघांच्या भाषणात ठाकरे यांच्यावरील टीकेचा भाग कमी होता. कदाचित पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी आपल्या भाषणाचा भर मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या विकासकामांवर अधिक होता. बाकी नेत्यांनी मात्र आपल्या भाषणातून ठाकरे यांच्यावर आसूड ओढले.
उद्धव ठाकरे यांच्या सभेची गर्दी म्हणजेच लोक अजूनही ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्याचवेळी हे लोक मतदार संघाबाहेरून आणल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या सभेला किती लोक येणार याकडेच सर्वांचे लक्ष होते. या सभेसाठी दापोली, खेड आणि मंडणगड या तालुक्यांमधून अनेक एस. टी. बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. सभेच्या आधी एकेका भागातून या बसेस खेडमध्ये आल्या आणि गोळीबार मैदान पूर्ण भरले होते. मैदानावरील खुर्च्या भरल्या होत्या. शिवाय अनेक लोक मैदानावर आणि बाहेर रस्त्यावरही उभे होते. काही हौशी लोक झाडावर चढून सभा ऐकत होते.
रामदास कदम यांची जोरदार बॅटिंग
या सभेत सर्वाधिक आक्रमक भाषण शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले. कदम कुटुंबाला संपवण्याचे कसे कसे प्रयत्न झाले, हे पुन्हा सांगताना त्यांनी पुन्हा एकदा २००९च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला. सत्ता आल्यानंतर आपल्याला रत्नागिरीचे पालकमंत्रिपद न देता ज्या इतरांना ते देण्यात आले, त्यांच्यावरही टीका केली. अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी ‘एपी’ असा केला. त्यांचे भाषण टाळ्या मिळवणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणारे निवडणुकीच्या भाषणासारखे आक्रमक होते.
अर्धा तास समाचार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पहिला अर्धा तास आपल्याला मिळालेल्या वागणुकीचा, ठाकरे यांचा समाचार घेतला आणि नंतरचा अर्धा तास त्यांनी आपण मंजूर केलेल्या कामांची माहिती दिली.
सामंत अन् अजान
पालकमंत्री उदय सामंत यांनी तुलनेने सौम्य शब्दात ठाकरे यांच्यावर हल्ला केला. भाषणाच्या सुरुवातीलाच अजान झाल्याने ते शांत झाले. अजान संपल्यावर त्यांनी भाषण सुरू केले.
कदम यांचे षटकार
आमदार योगेश कदम यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भाषण करुन अनेक षटकार मारले. त्यात त्यांनी ठाकरे यांच्यासाेबतच अन्य काही ज्येष्ठ आमदारांवरही टोकाची टीका केली.