स्वप्न आमदाराचे पण नगराध्यक्षपदापासून सुरुवात करेन, उमेश सकपाळ यांचे स्पष्टीकरण
By संदीप बांद्रे | Published: August 14, 2023 06:15 PM2023-08-14T18:15:36+5:302023-08-14T18:17:10+5:30
चिपळूण : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सर्व काही मलाच पाहिजे अशा प्रवृत्तीची लोक आहेत. त्यामुळे मी एकनाथ शिंदे गटात ...
चिपळूण : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सर्व काही मलाच पाहिजे अशा प्रवृत्तीची लोक आहेत. त्यामुळे मी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत आहे. खरं तर माझे स्वप्न आमदारकीचे आहे, पण पक्षाने संधी दिली तर नगराध्यक्षपदापासून सुरुवात करेन, अशी अपेक्षा माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांनी सोमवारी (१४ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
उमेश सकपाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की, मी शिवसेना हे चार अक्षर आणि धनुष्यबाण हे चिन्ह सोडून कुठेही गेलेलो नाही. मला शिवसेनेचे विभागप्रमुख ते शहरप्रमुख पदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली. नगरसेवक झालो. ठाकरे गटात असताना मला अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण मी संघर्षातून पुढे आलो आहे. त्यामुळे त्रासाचे मला काहीच वाटले नाही.
चिपळूण शहरात महापूर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूणच्या मदतीला धावून आले. ते शिवसेनेतून बाजूला झाल्यानंतर त्यांचा खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांचे फलक लावले. मी ठाकरे गटाची साथ सोडणार नव्हतो पण महापुराच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी चिपळूणला योग्य ती मदत केली नाही. त्यामुळे लोकांमध्येही नाराजी आहे.
कार्यकर्त्यांच्या हाताला काम पाहिजे. परंतु, ठाकरे शिवसेनेत सध्या सर्वकाही मलाच पाहिजे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षण व पक्षाच्या माध्यमातून संधी मिळाली तर प्रथम मी चिपळूण शहराचा नगराध्यक्ष होईन. नगराध्यक्षपदाची परीक्षा पास झाल्यानंतर मला आमदार होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
सकपाळ यांचा शिंदे गटात उद्या प्रवेश
उमेश सकपाळ यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात उद्या १५ ऑगस्टला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या संपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.