Shivsena: राजकीय वर्चस्वाच्या लढाईत निवडणुकांआधीच शिमगा, शाब्दिक युद्ध अजून किती काळ चालणार?
By मनोज मुळ्ये | Published: September 23, 2022 03:54 PM2022-09-23T15:54:17+5:302022-09-23T15:57:28+5:30
शाब्दिक युद्ध अजून काही काळ चालणार
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : स्वतंत्र चूल मांडल्याने शिंदे गटाला आणि अनेकांनी जय महाराष्ट्र म्हटल्यामुळे शिवसेनेला आपल्या राजकीय वर्चस्वासाठी मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. अर्थातच यात जिल्ह्याचा विकास, रखडलेला रिफायनरी प्रकल्प, पाटबंधारे खात्याच्या प्रकल्पांसाठीचा निधी अशा कोणत्याही विषयांपेक्षा राजकीय कुरघोड्याच अधिक आहेत.
शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गट स्वतंत्र झाला आहे. आपण उचललेले पाऊल योग्य आहे आणि अधिकाधिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, हे दाखविणे शिंदे गटासाठी आवश्यक झाले आहे. शिवसेनेत कमी लोक राहिले आहेत आणि आपल्यासाेबत अधिक लोक आहेत, हे दाखविण्यासाठी शिंदे गटाला सतत कार्यरत राहावे लागणार आहे. हीच बाब शिवसेनेचीही आहे. अनेकांनी पक्ष सोडला. आता आणखी फाटाफूट होऊ नये यासाठी तसेच शिंदे गटाने पक्ष सोडून चूक केली आहे हे उरलेल्या कार्यकर्त्यांना दाखविण्यासाठी शिवसेनेलाही सतत कार्यरत राहावे लागणार आहे. कामाच्यादृष्टीने आणि शाब्दिक पातळीवर दोन्ही बाजूंना आक्रमकता ठेवावी लागणार आहे. त्याचेच प्रत्यंतर सध्या येत आहे.
जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय शिमग्याला सुरुवात झाली ती युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे. त्यांच्या या दौऱ्यात त्यांची भाषणे गाजण्यापेक्षा स्थानिक नेत्यांची भाषणेच अधिक गाजत आहेत.
रत्नागिरीत मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिल्यामुळे साहजिकच ठाकरे यांची पहिली सभा रत्नागिरीत झाली. या सभेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी मंत्री सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. अगदी राष्ट्रवादी सोडतानाचे संदर्भ देत त्यांनी सामंत यांच्यावर टीका केली. रत्नागिरीतही आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा आमदार जाधव यांच्याच भाषणाची चर्चा अधिक होती.
बालेकिल्ला कोणाचा?
साधारणपणे १९९५ सालापासून रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २५ वर्षे जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे. अनेक पंचायत समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. आता पाचपैकी तब्बल तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचा जोर वाढत असल्याने पुढच्या वेळी सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठीच ही वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे.
शिवसेनेला बंडाचा फटका मोठा
याआधीही शिवसेनेत बंड झाली आहेत. पण शिवसेनेचे काहीही बिघडलेले नाही, असा दावा शिवसेना करत असली तरी याआधीची बंड आणि आताचे बंड यात फरक आहे. याआधीची बंड एक एका व्यक्तीने केली होती. मात्र यावेळी खूप मोठ्या संख्येने फूट पडली आहे. त्यातच केवळ आमदारच नाही तर अगदी तळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत फुटीचे लोण पसरले आहे.
पुतळा जाळपोळ यासाठीच
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानावरुन शिवसेनेने त्यांचे पुतळे जाळण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन दापोलीत दोन्ही गटांमध्ये राडा झाला. या साऱ्यामागे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवणे हाच हेतू आहे की काय, अशी शंका येत आहे. नजीकच्या काळात आणखी काही प्रवेश होणार असल्याने शिंदे गट आणि शिवसेनेतील हे वाद वाढण्याचीच भीती आहे.
कदम-जाधव युद्ध
राजकीय वर्चस्वाच्या लढाईतूनच भास्कर जाधव आणि रामदास कदम या दोन बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्धच सुरू झाले आहे. २०१९ला शिवसेना सत्तेत येऊनही कोणतेही पद न मिळालेले आणि काहीसे शांत असलेले भास्कर जाधव आता अधिकच आक्रमक झाले असल्याचे दिसत आहेत.
- शिंदे गट स्थापन झाल्यापासून भास्कर जाधव यांच्या भाषणांना अधिकच धार आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौर्यात तर त्यांनी कधी नव्हे इतके आक्रमक भाषण केले. दापोली त्यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे जोरदार राळ उडाली आहे.
- भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप केल्यानंतर रामदास कदम यांनी दापोलीत येऊन त्यांना जोरदार उत्तर दिले आहे. त्याला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे हे शाब्दिक युद्ध अजून काही काळ चालणार असल्याचे दिसत आहे.