..तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 01:49 PM2022-03-25T13:49:59+5:302022-03-25T14:02:09+5:30
राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे.
रत्नागिरी : स्थानिक लोकांच्या मागणीवर शिवसेना अवलंबून आहे. स्थानिकांनी प्रकल्पाचे समर्थन केले तर त्याठिकाणी रिफायनरी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक भूमिका घेईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी रिफायनरीला समर्थन दिल्याचे वक्तव्य केल्याने रिफायनरीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे.
मात्र, या भागातील ग्रामस्थांनी रिफायनरीला पाठिंबा देत रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे शिवसेनाही आता एक पाऊल मागे आली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवावा, असे वक्तव्य केले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, स्थानिकांच्या मागणीवर शिवसेना अवलंबून असल्याचे वारंवार आम्ही सांगितले आहे.
स्थानिकांनी प्रकल्पाचे समर्थन केल्यास रिफायनरी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक भूमिका घेईल. रिफायनरीबाबत लोकांमधील गैरसमज दूर केले पाहिजेत. जे नकारात्मक आहेत, त्यांना सकारात्मक केले पाहिजे. चांगली पॅकेजीस दिली पाहिजेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
रिफायनरीबाबत शिवसेनेने युटर्न घेतला आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री उदय सामंत म्हणाले की, यात युटर्न कसला? आम्ही सुरुवातीपासून लोकांसोबत राहिलो आहोत. लोकांनी जर प्रकल्पाचे समर्थन केले तर शिवसेना लोकांच्या मागणीचा आदर करेल, असेही त्यांनी सांगितले.