'नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकालाही झोडून काढा'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 03:04 PM2020-03-01T15:04:02+5:302020-03-01T15:05:01+5:30
शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प पूर्णपणे रद्द केल्याची
राजापूर : नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची हकालपट्टी केल्याचेही सांगितले. या सभेला मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी व प्रकल्प विरोधी नेते अशोक वालम उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प पूर्णपणे रद्द केल्याची घोषणा यापूर्वी केली आहे. गुजरातमधील भूमाफिया एकत्र येऊन पुन्हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरत आहेत व ग्रामस्थांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. नाणार रिफायनरीचाचा विषय संपलेला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प गाडलेला आहे, तो परत कोणी उकरून काढण्याचा प्रयत्न करू नये. प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जनतेला शब्द दिला होता आता ते मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या तो शब्द कायम आहे. यापुढे या प्रकल्पाला कोणी जे शिवसैनिक पाठिंबा देतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेचा गमछा किंवा झेंडा घेऊन कोणी शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देईल त्याची गय केली जाणार नाही हा त्यांनी इशारा समजावा. यापुढे जो शिवसैनिक रिफायनरीचे समर्थन करेल त्याला झोडून काढावे, असेही या सभेत राऊत यांनी सांगितले. उदय सामंत यांनीदेखील काही झाले तरी नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, असे स्पष्टपणे सभेत जाहीर केले. या सभेसाठी या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.