शिवसेनेच्या नात्यात दरार, भाजप-मनसे जोडीदार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:26 PM2020-12-19T19:26:40+5:302020-12-19T19:28:54+5:30
Bjp mns ratnagirinews- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी करण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे विरोधक सारखेच असल्याने हे नवीन मेतकूट जुळण्याची तयारी सुरू झाली आहे.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी करण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे विरोधक सारखेच असल्याने हे नवीन मेतकूट जुळण्याची तयारी सुरू झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद सर्वात मोठी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचाच वाटा खूप मोठा आहे. जिल्ह्यात पाचपैकी चार आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेचे पारडे जड आहे. एक आमदार राष्ट्रवादीचा असल्याने राष्ट्रवादीकडेही चांगली ताकद आहे.
भाजपची पंचायत समितीत मर्यादित ताकद आहे. काँग्रेस खूप क्षीण झाली आहे आणि मनसेला अजून राजकीय पातळीवर अपवादात्मक यश मिळाले आहे. या एकूणच राजकीय बलाबलामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे.
राज्याच्या सत्तेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही सहभागी आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हीच महाविकास आघाडी व्हावी, असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटते. अशी महाविकास आघाडी करण्याबाबत अजून या पक्षांपैकी कोणीही पुढाकार घेतलेला नाही. मात्र, ही महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी होऊ शकेल, अशी शक्यता आहे.
अशी आघाडी झाली तर ती भाजप विरोधातच उभी राहील. त्यामुळे भाजपने आतापासूनच जोडीदार म्हणून मनसेकडे हात पुढे केला असल्याचे समजते. जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यात शक्य तेथे एकमेकांना मदत करुन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा जिथे आशा आहे, अशा ठिकाणी जोर दिला जाण्याची शक्यता आहे.
पटवर्धन-चव्हाण मैत्री
भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्यामध्ये आधीपासूनच मैत्री आहे. त्यामुळे ही मैत्री आता ग्रामपंचायत निवडणुकीत दृढ होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत कधीही न झालेली ही युती आता होण्याची तयारी सुरू झाली आहे.
काहीही घडू शकतं
मनसेसोबत युती होणार आहे का, तशी चर्चा सुरू झाली असल्याची माहिती कितपत सत्य आहे, याबाबत बोलताना ह्यराजकारणात कधीही, काहीही घडू शकते, एवढ्या मोजक्याच शब्दात ॲड. दीपक पटवर्धन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत येत्या काही दिवसातच सगळे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.