मुसळधार पावसात शिवसेनेची राजापुरात संघर्ष यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 04:23 PM2018-07-08T16:23:33+5:302018-07-08T16:25:12+5:30
नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेने विरोधाची धार अधिक तीव्र केली आहे. रविवारी (8 जुलै) कोसळणाऱ्या मुसळधार पावसात शिवसेनेने तालुक्यातील डोंगर तिठा येथून संघर्ष यात्रेला सुरूवात केली.
राजापूर : नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेने विरोधाची धार अधिक तीव्र केली आहे. रविवारी (8 जुलै) कोसळणाऱ्या मुसळधार पावसात शिवसेनेने तालुक्यातील डोंगर तिठा येथून संघर्ष यात्रेला सुरूवात केली. या संघर्ष यात्रेचे नेतृत्व खासदार विनायक राऊत यांनी केले. ‘रिफायनरी हटाव’, ‘रद्द करा रद्द करा रिफायनरी रद्द करा’,‘भाजपा हटाव, कोकण बचाव’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरीबाबत भाजपाने सकारात्मक पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाला परिसरातील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे भाजपाव्यतिरिक्त इतर पक्षांनी रिफायनरी विरोधात आवाज उठविला आहे. शिवसेनेने आपण स्थानिकांसमवेत असल्याचे सांगून प्रकल्पाविरोधात असणारी विरोधाची धार अधिक तीव्र करण्यास सुरूवात केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी केली. यावेळी कोकणातील इतर आमदारही उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तालुक्यातील डोंगर तिठा ते चौके अशी दोन किलोमीटरची संघर्ष यात्रा काढण्यात आली. सकाळी ११.३० वाजता या यात्रेला सुरूवात करण्यात आली. या यात्रेत परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेला सुरूवात होताच मुसळधार पावसाचे आगमन झाले. या पावसातच जोरदार घोषणाबाजी देत ही यात्रा सुरूच ठेवण्यात आली होती. या यात्रेत त्यांच्यासमवेत आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भाजपा सरकार आणि मोदीविरोधात घोषणाबाजी करत प्रकल्प हटवण्याची मागणी करण्यात आली.