रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा सावंत बिनविरोध
By Admin | Published: March 21, 2017 05:16 PM2017-03-21T17:16:40+5:302017-03-21T17:16:40+5:30
उपाध्यक्ष पदी संतोष थेराडे यांची निवड
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी : स्पर्धेत असलेल्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यांना बाजूला सारून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रत्नागिरी तालुक्यातील स्नेहा सावंत यांनी तर उपाध्यक्ष पदी संतोष थेराडे यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेचे एकतर्फी वर्चस्व असलेल्या या जिल्हा परिषदेत दोन्ही निवडणुका बिनविरोधच झाल्या. या नियुक्त्या सव्वा वर्षासाठी आहेत.
जिल्हा परिषदेच्या ५५पैकी ३९ जागा जिंकून शिवसेनेने पूर्ण वर्चस्व मिळवले आहे. १५ जागा राष्ट्रवादीकडे तर एक जागा काँग्रेसकडे आहे. अध्यक्षपदासाठी पहिल्यापासून जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पत्नी रचना महाडिक यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर रत्नागिरी आणि लांजा तालुकाही या स्पर्धेत दाखल झाले. रत्नागिरीतून स्नेहा सावंत आणि लांजातील स्वरूपा साळवी यांची नावे चर्चेत होती. त्या-त्या भागातील आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी बाजी मारली आणि या पदासाठी स्नेहा सावंत यांचे नाव निश्चित झाले. सोमवारी रात्री १0 वाजेपर्यंत बैठक सुरू होती. त्यानंतर स्नेहा सावंत यांचे नाव निश्चित झाले. उपाध्यक्ष पदासाठी संगमेश्वर तालुक्यातील कडवई गटातील संतोष थेराडे यांचे नाव निश्चित झाले. तसे पत्र शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी पाठवून दिले आहे.
राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदासाठी नेत्रा ठाकूर यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र आंब्रे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. (प्रतिनिधी)