रत्नागिरीची शिवानी दोन हजार तासांच्या विमान उड्डाणासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:12 PM2024-08-19T18:12:24+5:302024-08-19T18:14:51+5:30
रत्नागिरी : बालपणी पायलट होण्याचे पाहिलेले स्वप्न जिद्द, प्रयत्न व कठोर परिश्रमाने रत्नकन्या शिवानी सुबोध नागवेकर हिने सत्यात उतरवले ...
रत्नागिरी : बालपणी पायलट होण्याचे पाहिलेले स्वप्न जिद्द, प्रयत्न व कठोर परिश्रमाने रत्नकन्या शिवानी सुबोध नागवेकर हिने सत्यात उतरवले आहे. सध्या हरयाणा गुडगाव येथे पायलट प्रशिक्षण घेणारी शिवानी २००० तासांचे विमान उड्डाण प्रवास झाल्यावर लवकरच ती मुख्य पायलट म्हणून सेवेत रुजू होणार आहे. शिवानीने घेतलेल्या या भरारीने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रत्नागिरीत जन्मलेली शिवानी रत्नागिरीतील ज्येष्ठ व्यायामपटू भाई विलणकर यांची नात व श्रद्धा आणि सुबोध नागवेकर यांची कन्या आहे. शिवानीला बालपणापासून विमानाची आवड होती. मात्र, केवळ हवाई सफर न करता आपण स्वत: ते उडवायचे अशी जिद्द तिने मनाशी बाळगली हाेती. त्यामुळेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच अचानक तिने हे शिक्षण थांबवून थेट मुंबई गाठली. पायलट होण्यासाठी बीएससी एव्हिनेशनसाठी प्रवेश घेतला. पायलट होण्यापूर्वी अभ्यासक्रम व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने बारामती येथील रेड बर्ड फ्लाईंग अकॅडमीमध्ये पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिथेही तिने २०० तास विमान चालविण्याचे प्रात्यक्षिक पूर्ण केले.
अभ्यासक्रमात तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिची इंडिगो कंपनीत निवड झाली आहे. तेथील चार टप्प्यांत तिने प्रशिक्षण पूर्ण केले. दिल्लीमध्ये मुलाखत तर हैदराबाद येथील परीक्षेतही तिने यश मिळविले. सध्या कंपनीच्या माध्यमातून तिचे गुडगाव येथे प्रशिक्षण सुरू आहे. चिकाटी, परिश्रम व सचोटीच्या जोरावरच शिवानीने अल्पावधीत यश संपादन केले आहे. शिवानीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांसह आजोबांचेही पाठबळ लाभले. त्यांच्या प्राेत्साहनामुळेच तिने यशाचे शिखर गाठले आहे.