सभापतिपदांवर शिवसेनेचे वर्चस्व
By admin | Published: January 18, 2016 10:49 PM2016-01-18T22:49:53+5:302016-01-18T23:39:33+5:30
जिल्हा परिषद : चाळके, झापडेकर, तावडे नवे सभापती; भाजपचा बहिष्कार
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ सभापतिपदी विलास चाळके यांची, बांधकाम व आरोग्य सभापतिपदी देवयानी झापडेकर यांची आणि महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने युतीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
या निवडीनंतर जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे निर्विवादपणे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर होणाऱ्या सभापतिपदांसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. या इच्छुकांमध्ये सदस्य विलास चाळके, वेदा फडके, दुर्वा तावडे आणि विनया गावडे यांच्या नावांची राजकीय गोटात चर्चा सुरू होती.
रत्नागिरी तालुक्याला सभापतिपद मिळणार हे निश्चित होते. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषद सदस्या विनया गावडे यांचे नाव आघाडीवर होते. मागील वेळेला सभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये देवयानी झापडेकर यांचे नाव अचानक बाजूला केले होते. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. झापडेकर यांना बांधकाम व आरोग्य सभापतिपद देण्यात आल्याने शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
सभापतिपद संगमेश्वर आणि राजापूर तालुक्याला देण्यात येणार हे निश्चित होते. सुरुवातीपासून सभापतिपदाच्या शर्यतीमध्ये विलास चाळके आणि दुर्वा तावडे होते. अखेर शिक्षण व वित्त सभापतिपदी विलास चाळके आणि महिला व बालकल्याण सभापतिपदी दुर्वा तावडे यांची निवड बिनविरोध झाल्याचे प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकार्डे यांनी जाहीर केले. समाजकल्याण समितीवरील शीतल जाधव यांनी राजीनामा दिलेला नसल्याने त्या पदावर कायम आहेत.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, माजी आमदार गणपत कदम, सुभाष बने, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती, खातेप्रमुख, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक यांनी नूतन सभापतींना शुभेच्छा दिल्या.
-
पंचायत समिती सभापतिपदी बाबू म्हाप?
रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी महेंद्र झापडेकर, बाबू म्हाप यांच्या नावाची चर्चा होती. झापडेकर यांच्या पत्नी देवयानी झापडेकर यांना जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापतिपद देण्यात आले. त्यामुळे झापडेकर यांचे नाव सभापतिपदाच्या शर्यतीतून मागे पडले. आता आमदार उदय सामंत समर्थक बाबू म्हाप यांचे नाव रत्नागिरी पंचायत समिती सभापतिपदी निश्चित झाले आहे.
आमदार राजन साळवी यांचे वर्चस्व
जिल्हा परिषद सभापती निवडीमध्ये आमदार राजन साळवी यांचे वर्चस्व आहे. तीनपैकी चाळके आणि तावडे हे दोन सभापती साळवी यांच्या मतदारसंघातील आहेत. तिसऱ्या सभापती झापडेकर यांचे पती महेंद्र झापडेकर हे साळवी समर्थक आहेत. त्यामुळे या निवडीवर साळवी यांचेच वर्चस्व असल्याची चर्चा उपस्थित शिवसैनिकांमध्ये सुरू होती.
भाजप, राष्ट्रवादी गैरहजर
जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी आणि भाजपचा एकही सदस्य छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपस्थित नव्हता. मित्रपक्ष असलेल्या भाजपला महिला व बालकल्याण सभापती देण्याचे पूर्वी ठरले होते. मात्र, भाजपला बाजूला ठेवून शिवसेनेने महिला व बालकल्याण सभापतिपद स्वत:कडे ठेवले. त्यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरल्याने त्यांच्या सर्व सदस्यांनी सभापतिपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला.