शिवसेनेचे मनसुबे धुळीला
By admin | Published: April 1, 2016 10:40 PM2016-04-01T22:40:34+5:302016-04-02T00:16:15+5:30
काँग्रेसचे वर्चस्व : कुवेशी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक
जैतापूर : राजापूर तालुक्यातील कुवेशी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत शिवसेनेचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत. चेअरमनपदी मनोहर कांबळी, तर व्हाईस चेअरमनपदी वैभव कुवेसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. १३ सदस्य संख्या असलेल्या सोसायटीवर काँग्रेसचे बारा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. माजी अध्यक्ष सरीता नार्वेकर यांची निवडही बिनविरोध करीत निवडणुकीचा खर्च वाचवला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सेना कार्यकर्त्यांच्या ताब्यात असलेली कुवेशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी तोट्यात सुरू होती. यावेळी सोसायटी ताब्यात घेण्याचा चंग कुवेशीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बांधला होता. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहा जागांसाठी अर्ज भरले व नेहमीप्रमाणे कोणाचेच अर्ज येणार नाहीत, असे गृहीत धरून आपली वाटचाल सुरू ठेवली होती.
मात्र, काँग्रेस कार्यकर्ते मनोहर कांबळी, वैभव कुवेसकर यांच्यासह सतीश बहिरे, रोहिदास आडिवरेकर आदींनी तेरा जागांसाठी चौदा उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूक अटळ झाली होती. काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होणार, अशी परिस्थिती असल्यामुळे अनेक वर्षे सोसायटी तोट्यात नेलेल्यानी सोसायटीला निवडणुकीच्या खर्चात लोटू नका, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे सेनेच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेणे पसंत केले. मात्र, माजी अध्यक्षांच्या अनुभवाचा सोसायटीला उपयोग होण्यासाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांचे अर्ज मागे घेत सोसायटीची निवडणूक बिनविरोध केली, तर चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणूकही बिनविरोध केली. या निवडणुकीत मनोहर कांबळी, वैभव कुवेसकर, प्रभाकर कुवेसकर, सुरेश कांबळी, किशोर गावकर, सतीश बहिरे, वसंत बावकर, अनंत होलम, चंद्रकला गवाणकर, विनायक खडपे, पर्शुराम बावकर, प्राची ताम्हनकर, सरीता नार्वेकर हे बिनविरोध निवडून आले, तर काँग्रेसकडून सुहास बावकर व रंजिता आडिवरेकर यांनी अर्ज मागे घेतले तर विरोधी पक्षातील विलास नाडणकर, सदानंद बहिरे, प्रकाश डोर्लेकर, उर्मिला नार्वेकर, भाग्यश्री करगुटकर यांनी आपले अर्ज मागे घेतले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. गुरव यांनी काम पाहिले. या निवडणुकीनंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र नागरेकर, सागवे विभाग अध्यक्ष गिरीष करगुटकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. (वार्ताहर)
प्रतिष्ठेची लढाई : सेना - काँग्रेसने कसली होती कंबर
राजापूर तालुक्यात आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेचा दबदबा आहे. शिवसेनेच्या वर्चस्वामुळे कुवेशी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोसायटीवर वर्चस्व मिळविण्यासाठी सेना आणि काँग्रेसने कंबर कसली होती. यामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे.
जोरदार दे धक्का
तालुक्यात सेनेचे वर्चस्व असूनही कुवेशी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला जोरदार दे धक्का दिला आहे. १३ पैकी १२ सदस्य काँग्रेसने बिनविरोध निवडून आणून सोसायटीवर वर्चस्व मिळविले आहे.