गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरीत ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:18 PM2018-03-19T16:18:46+5:302018-03-19T16:18:46+5:30
मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरी शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करुन मनमोहक देखावे त्यात सहभागी झाले होते.
रत्नागिरी : मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरी शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करुन मनमोहक देखावे त्यात सहभागी झाले होते.
गुढी पाडव्यानिमित्त शहरातील मारुती मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिरवणूक काढली होती. यामध्ये अनेक चित्ररथ विविध फुलांनी सजविलेले होते. भैरी मंदिरातून निघालेल्या यात्रेत अनेक चित्ररथ सहभागी झाले.
सकाळी भैरी मंदिरात दोन गुढींची पूजा करण्यात आली. विश्वस्त मंडळी, ग्रामस्थ, मानकरी यांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर मंदिरातून सवाद्य श्री भैरीची मूर्ती व पालखी बाहेर काढण्यात येऊन स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. ही शोभायात्रा खालची आळी, गोखलेनाका, बसस्थानक, जयस्तंभ अशी शोभायात्रा काढली होती.
मारुती मंदिर येथून निघालेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची शोभायात्रा आणि भैरी मंदिरातून काढण्यात आलेली शोभायात्रेची जयस्तंभ येथे भेट झाली. तेथून या दोन्ही शोभायात्रा एकत्रितरित्या रामआळीमार्गे पतितपावन मंदिरमध्ये आल्यानंतर तेथे सांगता करण्यात आली. कुवारबाव येथे कुवारबाव पंचक्रोशी ब्राम्हण सभेतर्फे शोभायात्रा काढण्यात आली.