मानसिक आजारातून मुक्त झालेल्या शोभाची ‘राजरत्न’ने केली घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:09+5:302021-06-26T04:22:09+5:30
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील गवाणे येथील मानसिक रूग्ण असलेली शोभा दाभोळकर ही महिला आजारातून मुक्त होताच तिला मनोरूग्णालय आणि ...
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील गवाणे येथील मानसिक रूग्ण असलेली शोभा दाभोळकर ही महिला आजारातून मुक्त होताच तिला मनोरूग्णालय आणि येथील राजरत्न प्रतिष्ठानच्या टीमने सन्मानाने तिच्या घरी सोडले. गरीब कुटुंबातील तिचे आप्त या घटनेने भारावून गेले.
काही महिन्यांपूर्वी लांजा गवाणे येथे एक मानसिक महिला रुग्ण असल्याचे गवाणे ग्रामस्थांनी राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे यांना फोन करून सांगितले. ही महिला आपले घरदार सोडून ऊन, पावसात एकटीच मिळेल ते खात आजूबाजूच्या शेतात वास्तव्याला होती. राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे लागलीच राजरत्न प्रतिष्ठानची महिला टीम राही सावंत, जया डावर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांना घेऊन गवाणे येथे पोहोचले. मानसिक रुग्ण असलेली शोभा दाभोळकर हिला ताब्यात घेऊन तिला आंघोळ व नवीन कपडे घालून रत्नागिरी जिल्हा मनोरुग्णालय येथे आणले. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शोभावर उपचार सुरु झाले.
काही महिन्यांच्या कालावधीनंतर शोभा पूर्णपणे बरी झाली. मनोरुग्णालयातील सोशल वर्कर नितीन शिवदे यांनी राजरत्न प्रतिष्ठानशी संपर्क साधून शोभा हिला तिच्या गवाणे येथील घरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वतंत्र वाहनाने राजरत्न प्रतिष्ठानचे पदाधिकारी सचिन शिंदे, रुपेश सावंत, छोटू खामकर, ऐश्वर्या गावकर, तन्मय सावंत व सोशल वर्कर नितीन शिवदे व महिला कर्मचाऱ्यांनी गवाणे येथे तिच्या भावाच्या घरी जाऊन तिला नातेवाईकांच्या रितसर ताब्यात दिले. मनोरूग्णालयातून शेाभा हिला थेट तिच्या घरी सोडण्यात आल्याने तिच्या कुटुंबीयांनी मनोरूग्णालयाचे तसेच राजरत्न प्रतिष्ठानचे आभार मानले.