वाढीव वीजदराचा ग्राहकांना शॉक
By admin | Published: December 26, 2014 11:33 PM2014-12-26T23:33:56+5:302014-12-26T23:46:08+5:30
महावितरण कंपनी : अचानक दरवाढीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम
चिपळूण : ऐन हिवाळ्यात कमालीची थंडी पडत असताना आलेल्या वीज बिलामुळे अनेकांना शॉक बसला आहे. वीजबिलाची रक्कम अव्वाच्यासव्वा वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, काही लोक बिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयावर धडकत आहेत.
राज्य शासनाने निवडणुकीनंतर वीजबिलावर ग्राहकांना देण्यात येणारी सबसिडी रद्द केल्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून वीजबिले वाढली आहेत. चालू वर्षात जी वीजबिले ग्राहकांच्या हाती पडली आहेत. त्यामध्ये अतिरिक्त आकाराच्या नावाखाली १०० ते १५० रुपये वाढ झाली आहे. शिवाय अंतरिम आकार, जेनको आकार, ट्रान्सको आकार या विविध नावाखाली ग्राहकांना महावितरणने झटका दिला आहे.
वीजबिल वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले असून, महावितरणच्या कार्यालयावर वीजबिल कमी करुन घेण्यासाठी धावत आहेत. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे रिंडिंग जास्त असूनही वीजबिल कमी आहे व डिसेंबर महिन्यात रिडिंग कमी असूनही बिल जास्त आहे. त्यामुळे अधिकारी व ग्राहक यांच्यामध्ये नाहक वाद निर्माण होत आहे.
वीजबिल भरणा केंद्रावर व एटीपी मशिनद्वारे वीजबिल भरले जात असून, ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सबसिडी द्यावी व वीजबिले कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)