दुकान उघडण्याचे आदेश स्टेटसवर, पोलिसांची कारवाई दुकानदारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:48+5:302021-05-19T04:32:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ताउते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम साहित्यांची दुकाने उघडण्याची परवानगी तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ताउते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम साहित्यांची दुकाने उघडण्याची परवानगी तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून दिली. मात्र, मंगळवारी दुकाने उघडताच, पोलिसांनी कारवाईचा तडाखा लावला. व्यापाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करताच, मंत्री उदय सामंत रत्नागिरीत दाखल झाले. पुढील आठ दिवस दुकान ९ ते १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्याची सूचना त्यांनी केली.
रविवारपासून जिल्ह्याला ताउते चक्रीवादळाने झोडपून काढले. शहरी आणि ग्रामीण भागातही अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे घर दुरुस्तीसाठी आवश्यक सामान नागरिकांना मिळावे, या हेतूने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी फक्त बांधकाम साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. मात्र, वादळ परिस्थितीतील नुकसानीचे पंचनामे इत्यादी कामे सुरू असल्याने, त्यांनी तातडीने जनतेला कळावे, यासाठी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटस वर तसा मेसेज ठेवला. मात्र, मंगळवारी सकाळी लेखी आदेश नसल्याचे कारण देत, पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव केला.
ही घटना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कळताच त्यांनी आपला नियोजित दौरा सोडून व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रत्नागिरी बाजारपेठेत धाव घेतली. वादळ परिस्थितीमुळे जनतेला घर दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी साहित्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची दुकाने पुढील आठ दिवस सकाळी ९ ते १ सुरू ठेवण्याबाबत आदेश काढण्याच्या सूचना उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या असून, तसे आदेश काढण्यात येणार आहेत.
मात्र, लेखी आदेश नाही म्हणून कारवाईत तत्परता दाखविणाऱ्या पोलिसांबाबत नाराजीचा सूर उमटत आहेत. तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून दिलेल्या आदेशामुळे यापूर्वीही वाद झाला होता. हे आदेश पोलीस प्रशासन ग्राह्य धरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांना दंडाची रक्कम परत मिळणार का, ही कारवाई मागे घेणार का, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत.
--------------------
रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास पाेलिसांनी मज्जाव केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत येऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली.