जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारी दुकाने सकाळी चार तास सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:31+5:302021-04-22T04:32:31+5:30

रत्नागिरी : राज्य शासनाने लाॅकडाऊनच्या अनुषंगाने सुधारित आदेश मंगळवारी जारी केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १४ एप्रिलच्या ...

Shops serving essentials will be open for four hours in the morning | जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारी दुकाने सकाळी चार तास सुरू राहणार

जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारी दुकाने सकाळी चार तास सुरू राहणार

Next

रत्नागिरी : राज्य शासनाने लाॅकडाऊनच्या अनुषंगाने सुधारित आदेश मंगळवारी जारी केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १४ एप्रिलच्या आदेशास मंगळवारी रात्री पुरवणी आदेश काढले आहेत. त्यानुसार आता जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारी किराणा, दूध, भाजीपाला या दुकानांना आता सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपाेच सेवा देता येणार आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढलेल्या या पुरवणी आदेशानुसार, रत्नागिरी जिल्ह्यामधील वैद्यकीय, आरोग्य सुविधा व औषधांची दुकाने पूर्ण वेळ खुली राहतील. नगरपालिका-नगरपंचायत हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागातील ज्या गावाची लोकसंख्या ५००० पेक्षा जास्त आहे, ज्या भागामध्ये शहरीकरण वाढत आहे, अशा ठिकाणी किराणा मात्र दुकाने, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने व इतर दुकाने ही दिवसभर बंद राहतील. त्यांना अन्नधान्याचे व सामानाचे वितरण केवळ घरपोच करता येईल. मात्र, या भागात भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, विक्रेत्यांसाठी त्यांच्या मालाची विक्री सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत करता येईल. त्यानंतर दुकाने पूर्णपणे बंद राहतील. त्यासाठी त्यांची आरटीपीसीआर तसेच अंंटिजेन चाचणीचे निगेटिव्ह अहवाल दर्शनीय भागात लावणे बंधनकारक असेल. इतर वेळी व्यवसाय बंद राहील.

५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत खुली राहतील. शासकीय स्वस्त धान्य दुकाने व केरोसीन दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू राहतील.

या सर्वासाठी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देता येईल. घरपोच सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे, ॲंटिजन, आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील, त्याबाबतचे निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र त्यांना स्वत:कडे बाळगणे आवश्यक राहील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्‍ती अथवा संस्थेवर भारतीय साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Shops serving essentials will be open for four hours in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.