गुन्हे दाखल केले तरीही दुकाने सुरू ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:28+5:302021-04-07T04:32:28+5:30
रत्नागिरी : गुन्हे दाखल केले तरीही दुकाने चालू ठेवणार, अशी भूमिका रत्नागिरीतील काही व्यापाऱ्यांची कायम असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा ...
रत्नागिरी : गुन्हे दाखल केले तरीही दुकाने चालू ठेवणार, अशी भूमिका रत्नागिरीतील काही व्यापाऱ्यांची कायम असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मिनी लाॅकडाऊनला कडाडून विराेध केला आहे. दरम्यान, रत्नागिरी शहर व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली असता सामंत यांनी आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्यावर्षी झालेल्या लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कर्जांचे हप्तेही भरता आलेले नाहीत. गेल्या वर्षीच्या नुकसानीचा फटका अजूनही व्यापारी वर्गाला बसलेला आहे. काही महिन्यापूर्वी सुरू झालेले उद्योग व्यवसाय अजूनही सुरळीत झालेले नाहीत. असे असतानाच आता पुन्हा मिनी लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केलेत तरी आम्ही दुकाने सुरू ठेवणारच असा सूर सर्वच व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊनला तीव्र विरोध केला आहे.
जिल्हा प्रशासनाचे आदेश जाहीर होताच रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या कथन केल्या. मागील लॉकडाऊनमध्ये व्यापारी देशोधडीला लागला असून आता करण्यात आलेल्या नियमांमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. आता तोटा सहन करण्याची आमची क्षमता संपली असे या व्यापाऱ्यांनी सांगितले. यावर मंत्री उदय सामंत यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडू असे या व्यापाऱ्यांना आश्वासन दिले. उदय सामंत यांच्या विनंतीनुसार या व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले असून आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट
कोरोनाच्या अनुषंगाने गेल्या वर्षी झालेल्या लाॅकडाऊनमध्ये सर्वच व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहर व्यापारी संघातर्फे आम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेश भिंगार्डे,अध्यक्ष, रत्नागिरी शहर व्यापारी संघ
चौकट
रत्नागिरी शहरात सध्या व्यापाऱ्यांमध्ये दुमत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा दुकाने बंद ठेवण्यास विरोध आहे. अशा परिस्थितीत सर्वच व्यापारी बंदचा निर्णय मानणार की विरोध करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.